'मी धमक्यांना घाबरत नाही, माझं काम सुरूच ठेवणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 12:26 PM2021-12-01T12:26:20+5:302021-12-01T12:27:24+5:30

गौतम गंभीरला आठवडाभरात तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. याआधी गौतम आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही मेलद्वारे देण्यात आल्या होत्या.

'I am not afraid of threats, I will continue my work', Gautam gambhir tells ISIS | 'मी धमक्यांना घाबरत नाही, माझं काम सुरूच ठेवणार'

'मी धमक्यांना घाबरत नाही, माझं काम सुरूच ठेवणार'

Next
ठळक मुद्देगौतम गंभीरला आठवडाभरात तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. याआधी गौतम आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही मेलद्वारे देण्यात आल्या होत्या

नवी दिल्ली - पूर्व दिल्लीचे भाजप खासदार आणि आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIS) काश्मीरच्या ईमेल आयडीवरून तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरला पाठवलेल्या मेलमध्ये दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत, असे लिहिले आहे. तसेच, आमचे गुप्तहेर दिल्ली पोलिसांत आहेत, तुझ्याबद्दल सर्व माहिती आम्हाला मिळत आहे, असंही त्या मेलमध्ये लिहीलं आहे. आता, गौतमनेही या धमकीला आपण भीक घालत नसल्याचं म्हटलं आहे. 

गौतम गंभीरने आपण कुठल्याही धमकीला भीत नसून तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. मी माझं काम थांबवणार नाही, कार्यक्रमांमध्ये मी भाग घेतच राहिल, असे गंभीरने म्हटले आहे. तसेच, सध्या माझे लक्ष दिल्ली प्रीमीयर लीगवर आहे. युमना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होत असलेल्या स्पर्धेच्या यशस्वीतेवर माझं लक्ष असल्याचंही गंभीरने म्हटलं आहे. दरम्यान, गौतम गंभीर काश्मीरमधील शहिदांच्या कुटुंबीयांना सातत्याने मदत करत असतो. तसेच, येथील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही तो पार पाडतो. 

गौतम गंभीरला आठवडाभरात तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. याआधी गौतम आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही मेलद्वारे देण्यात आल्या होत्या. 23 नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीरला पहिला ईमेल आला, ज्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत गंभीरने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली. पण 24 तारखेला त्याला पुन्हा एक ईमेल आला, ज्यामध्ये 'काल तुला मारणार होतो पण वाचलास, काश्मीरपासून दूर राहा' असे लिहिले होते. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. ही धमकी त्याला ISIS काश्मीरने दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीच्या ईमेल्समागे अकाऊंट हँडलर साहिद हमीदला पोलिसांनी ओळखले होते.

धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आला

गंभीरला आलेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून आल्याची माहिती समोर आली होती. ज्या सिस्टीमद्वारे हा ई-मेल पाठवला गेला, त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानमधील असल्याचे आढळून आले आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अॅड्रेसही सापडला आहे. विशेष म्हणजे, फक्त गौतम गंभीरच नाही तर इतरही अनेकांना दहशतवादी संघटना ISIS च्या नावाने धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त इतर अनेक यंत्रणा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
 

Web Title: 'I am not afraid of threats, I will continue my work', Gautam gambhir tells ISIS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.