मार्सेल, फ्रान्स: राफेल डील प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी म्हटलं आहे. दसॉल्ट ही कंपनी राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करते. राफेल-रिलायन्सच्या भागिदारीवरुन राहुल गांधींनी अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं ट्रॅपियर यांनी स्पष्ट केलं. एरिक ट्रॅपियर यांनी राफेल डील आणि त्यावरुन होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी या करारातील अनेक मुद्यांवर भाष्य केलं.राफेल डीलबद्दल मी खोटं बोलणार नाही, असं दसॉल्टच्या सीईओंनी म्हटलं. 'मी याआधीही याबद्दल बोललो आहे. मी तेव्हाही खरं बोललो आणि आताही खरंच बोलतोय. मी खोटं बोललो, असं याआधी कधीही झालेलं नाही. तुम्ही सीईओ पदावर काम करताना खोटं बोलू शकत नाही,' असं ट्रॅपियर राहुल गांधींच्या आरोपांवर बोलताना म्हणाले. संरक्षण क्षेत्र आणि विमान निर्मितीमधला कोणताही अनुभव नसतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं दसॉल्टनं रिलायन्सला राफेलचं कंत्राट दिल्याचा आरोप राहुल यांनी वारंवार केला आहे. त्यावर एरिक यांनी डॅसोची भूमिका स्पष्ट केली. आम्ही स्वत:हून या करारासाठी रिलायन्सची निवड केली, असं त्यांनी सांगितलं.तोट्यात गेलेल्या रिलायन्समध्ये दसॉल्टनं 284 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या पैशांचा वापर अनिल अंबानींनी नागपूरात जमीन खरेदी करण्यासाठी केला, असा आरोप राहुल गांधींनी 2 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन केला होता. दसॉल्टचं सीईओ खोटं बोलत आहेत. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी झाल्यास त्यात मोदी 100 टक्के दोषी आढळतील, असा दावा राहुल यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपांबद्दल एरिक यांनी दु:ख व्यक्त केलं. याआधी आम्ही काँग्रेस सत्तेत असतानाही भारतासोबत अनेक करार केले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांच्या आरोपांमुळे दु:ख झाल्याची भावना एरिक यांनी व्यक्त केली.