नवी दिल्ली: सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली हे ऐकून खूप वाईट वाटले. त्याने खूप समाजकार्य केले आहे. त्यामुळे त्याची शिक्षा कमी व्हायला पाहिजे, असे मत राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी मांडले. त्या गुरूवारी संसदेच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांना अभिनेता सलमान खान याला काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा जया बच्चन यांनी म्हटले की, मला हे ऐकून वाईट वाटले. 20 वर्षांनी त्याला शिक्षा झाली, हे काहीसे अनाकलनीय आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजणांनी त्याच्यावर गुंतवणूक केली आहे. या निर्णयामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सलमान खानला दिलासा मिळायला हवा. त्याने बरेच समाजकार्य केले आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले. 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरुवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा तुरूंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर सलमान खान याला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात येणार असून आज त्याला जामीन मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे किमान आजचा दिवस तरी सलमान खानला तुरूंगातच काढावा लागणार आहे. हा निकाल सलमान खानसाठी मोठा झटका मानला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
सलमान खानला शिक्षा झाल्याचं वाईट वाटतं, समाजकार्यात त्याचं मोठं योगदान- जया बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 3:57 PM