'शरद पवार मोदींना का भेटले याची जास्त माहिती माझ्याकडे', संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 08:40 PM2022-04-06T20:40:18+5:302022-04-06T20:41:31+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यावर खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आणि राज्याशी निगडीत दोन मुद्द्यांवर मोदींशी बोलणं झाल्याचं सांगितलं.
नवी दिल्ली-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यावर खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आणि राज्याशी निगडीत दोन मुद्द्यांवर मोदींशी बोलणं झाल्याचं सांगितलं. आता शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मोदी आणि पवार भेटीबाबत मोठं विधान केलं आहे. शरद पवार मोदींना का भेटले? त्यांच्यात काय चर्चा झाली याची जास्त माहिती माझ्याकडे आहे हे भाजपा नेत्यांनी लक्षात घ्यावं, असं संजय राऊत म्हणाले. ते दिल्ली पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊतांनी यावेळी शरद पवार यांचे मोदींजवळ आपल्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले.
"महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबावासाठी कारवाई सुरू आहे, त्याबाबत पवारांनी याकडे मोदींचं लक्ष वेधलं. महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर अशी कारवाई सुरू आहे. आता पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने हे मोदींना सांगणं म्हणजे देशात ज्या ठिकाणी भाजपची सरकारं नाहीत. त्या सर्व विरोधी पक्षांचे हे प्रतिनिधीत्व आहे. शरद पवारांनी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेत काम केलं आहे. त्यांच्या विचारांची उंची वेगळी आहे, त्यामुळे त्यांनी मोदींसमोर विचार मांडले, हे अत्यंत महत्वाचे आहे", असे संजय राऊत म्हणाले.
मोदी-पवार भेटीची जास्त माहिती माझ्याकडे- राऊत
"सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे महाराष्ट्रातील जुन्या फळीतील नेते आहेत. त्यांच्यासोबत आम्ही जवळून काम केलं आहे. पण त्यांच्या भावना कितीही असल्या तरी शरद पवार पंतप्रधानांना का भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली. याची त्यांच्याकडे जी माहिती आहे. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे", असं संजय राऊत म्हणाले.
संसदेत मला बोलू दिलं नाही, राऊतांचा आरोप
"माझ्यासरख्या माणसाला संसदेत बोलू देत नाहीत. बोलल्यावर आम्ही कारवाईला सामोरे जातोय, मात्र आम्ही बलिदान द्यायला तयार आहे. आम्ही लढणारी लोकं आहोत. कायद्याचा केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर होत नाही आणि होणार नाही असं देशाचे गृहमंत्री संसदेत म्हणाले मी त्यांचं कौतुक केलं. पण हेच तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का? असं मी त्यांना विचारलं. ते माझं नावही घ्यायला घाबरलेत. मला बोलूच दिलं नाही. हाच तर अन्याय आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा हा नवीन लढा आहे आणि त्यासाठी आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत", असं संजय राऊत म्हणाले.