मुंबई - कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. या कालावधीत अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. यादरम्यान, कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली होती. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी अनेक जण अद्यापही वर्क फ्रॉम होमच करत आहेत. मात्र, अनेकांना घरातून पाय बाहेर काढावा लागत असून ऑफिसची वाट धरावी लागत आहे. त्यावरुनच, एका मुलीने वर्क फ्रॉम होम कसं चांगलय, याचा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, उद्योगपती हर्ष गोयंका यांनाही हा व्हिडिओ आवडला आहे.
कोरोना कालावधीतील वर्क फ्रॉम होमची संकल्पना अनेक कर्मचाऱ्यांना आवडू लागली आहे. अशा अनेक गोष्टीही आहेत ज्या ऑफिसमध्ये जाऊन काम करताना शक्य होत नाहीत, त्या घरून कर्मचाऱ्यांना करता येतात. परंतु सध्या हळूहळू कार्यालयं मर्यादित कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुरू होण्यासही सुरूवात झाली आहे. पण काही कर्मचाऱ्यांना अजूनही कार्यालयात जाण्याची इच्छा नसल्याचं दिसून येत आहे. अशातच एका महिला कर्मचाऱ्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ इन्स्टाग्रामपासूनफेसबुकपर्यंतसोशल मीडियावर सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. सर्वकाही चांगलं चालत आहे. कंपनीचा महसूलही वाढत आहे, पैसेही वाचत आहेत. तर अशा परिस्थितीत पुन्हा ऑफिस का सुरू करताय असंही ती या व्हिडीओतून विचारत आहे. तसंच आता कुर्ता आणि पायजम्यात राहण्याची आपल्याला सवय झाली आहे आणि आता आपल्याला इतर काही शक्य होणार नाही. जे लोकं म्हणतायत की आम्ही ऑफिसला मीस करतोय त्यांनी दुसऱ्यांना मुर्ख बनवावं असंही ती महिला म्हणत आहे. दरम्यान, आपण हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवल्याचंही तिनं व्हिडिओच्या अखेरिस म्हटलं आहे. मात्र, हर्ष गोयंका यांनी तिची कारणं आपल्याला आवडल्याचं सांगितलंय.