लखनऊ - उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर गोविंदनगर येथे एका ठिकाणी 'आय लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे सापडले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली असून, सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भुमिकेत आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाढदिवसाच्या पार्टीतून हे फुगे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही. सापडलेले फुगे लाल आणि हिरव्या रंगाचे आहेत. या सर्व फुग्यांवर इंग्रजी आणि उर्दू भाषेत 'आय लव्ह पाकिस्तान' लिहिण्यात आलं आहे.
एका व्यक्तीने आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे फुगे आणले होते. मात्र त्यावर 'आय लव्ह पाकिस्तान' लिहिल्याची आपल्याला कल्पना नव्हती असा दावा त्याने केला आहे. घरी आल्यानंतर हे माझ्या लक्षात आलं अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.
हिमाचल प्रदेशात सापडलेल्या पाकिस्तानी फुग्यासंबंधी लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले आहेत. हा फुगा सर्वात आधी खणी पंचायतीचे सुभाष कुमार यांना दिसला होता. बुधवारी सकाळी सुभाष कुमार जेव्हा शेतात गेले, तेव्हा त्यांना तिथे एक हिरव्या रंगाचा फुगा दिसला. यावर पाकिस्तानचा झेंडाही होता. सुभाष कुमार यांनी तात्काळ ही माहिती पंचायत प्रधान आणि इतर गावक-यांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फुगा आपल्या ताब्यात घेतला. पोलीस सध्या तपास करत आहेत.