नवी दिल्ली: देशात गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ६२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले व ४१२० जणांचा मृत्यू झाला. बुधवारची आकडेवारी लक्षात घेता नव्या रुग्णांच्या संख्येत गुरुवारी १४ हजारांनी वाढ झाली व मृतांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात ३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ३७ लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील १ कोटी ९७ लाख जण आजवर कोरोनामुक्त झाले.
बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३ लाख ४८ हजार होती व ४२०५ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी ३६२७२७ नवे कोरोना रुग्ण आढळले व ३५,२१८१ जण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ असून त्यातील १,९७,३४,८२३ जण बरे झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातल्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
१०० वर्षांनंतर अशी भयानक साथीच्या आजाराची परिस्थिती जगावर उद्भवली आहे. आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. अनेक लोक या कोरोनाच्या संकटातून जात आहेत. लोक ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहेत, त्याची जाणीव मला देखील आहे. जनतेचं दुःख मला समजतंय, त्यांच्या वेदना मलाही जाणवताहेत, असं म्हणत नरेंद्र मोदींनी देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यासोबतच नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. लस घेतली तरीही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात आत्तापर्यंत १८ कोटी लोकांनी लस घेतल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आज देशभरातील ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना ईद आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या.