नवी दिल्ली : भविष्यात मला आणखी काम करायचे आहे, असे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी म्हटले. अत्यंत प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बच्चन यांना येथे राष्ट्रपती भवनमध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात बच्चन म्हणाले, ‘२०१८ वर्षासाठी हा पुरस्कार मला जाहीर झाला, तेव्हा आधी वाटले की, मी अनेक वर्षे काम केल्यानंतर आता घरी शांतपणे बसावे, याचे तर हे संकेत नाहीत? काही आणखी कामे मला पूर्ण करायची आहेत आणि काही काम करण्यासाठी मला संधी मिळू शकेल, अशा काही निश्चित शक्यता आहेत. मला त्याबद्दल काही खुलासा हवा आहे एवढेच, असे बच्चन यांनी फिरकी घेत म्हटले.बच्चन यांनी सरकार, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचवणारे ज्युरी सदस्य यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘देवाची कृपी, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार यांचा पाठिंबा तर आहेच, परंतु भारतीय प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आणि सततचे प्रोत्साहन याबद्दल मी ऋणी आहे आणि त्याचमुळे मी येथे उभा आहे. हा पुरस्कार मी पूर्ण नम्रतेने आणि कृतज्ञ भावाने स्वीकारतो.’बच्चन यांना हा पुरस्कार गेल्या सोमवारी प्रदान केला जाणार होता. परंतु, प्रकृती बरी नसल्यामुळे ते जाऊ शकले नव्हते. रविवारी विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी घोषणा माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.बच्चन यांच्यासोबत पत्नी व खासदार जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन यावेळी उपस्थित होते. २०२० वर्षात अमिताभ बच्चन यांचे ‘गुलाबो सिताबो’, ‘चेहरे’, ‘झुंड’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.भारतीय चित्रपटांचे जनक धुंडीराज गोविंद फाळके यांच्या स्मरणार्थ १९६९ मध्ये हा पुरस्कार सुरू केला गेला. १९६९ मध्येच अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट प्रवासाला ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटातून प्रारंभ झाला होता. दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण कमल, पदक, शाल आणि रोख १० लाख रूपये, असे आहे.
भविष्यात मला आणखी काम करायचे आहे - बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:48 AM