‘राज्यपालांचा तो स्पर्श वाईट, अनेकदा धुतला चेहरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:22 PM2018-04-18T14:22:54+5:302018-04-18T15:32:38+5:30
महिला पत्रकारानं 'त्या' घटनेनंतर व्यक्त केला संताप
चेन्नई: तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच वादात सापडले आहेत. सेक्स फॉर डिग्री प्रकरणात नाव आल्यानं पुरोहित यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. मात्र पत्रकार परिषद संपताना त्यांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीशिवाय स्पर्श केला. त्यामुळे पुरोहित पुन्हा नव्या वादात अडकले.
सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र याठिकाणी राज्यपालांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. यानंतर महिला पत्रकारानं ट्विट करत याबद्दल संताप व्यक्त केला. 'पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझ्या संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला,' असं महिला पत्रकारानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यपालांचा हेतू काहीही असला तरी त्यांचा स्पर्श हा चुकीचाच होता, असंही महिला पत्रकारानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'त्या प्रकारानंतर मी माझा चेहरा अनेकदा धुतला. मात्र मी त्या धक्क्यातून अद्याप सावरु शकलेले नाही. मला राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा खूप राग येतो आहे. माझ्या गालाला स्पर्श करणं हे तुमच्यासाठी प्रोत्साहन देणं किंवा आजोबा-नातीच्या प्रेमासारखं असेल. पण माझ्यासाठी तुम्ही चुकीचेच आहात,' अशा शब्दांमध्ये लक्ष्मी यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. सर्वच स्तरातून जोरदार टीका जाल्यावर राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे.
Washed my face several times. Still not able to get rid of it. So agitated and angered Mr Governor Banwarilal Purohit. It might be an act of appreciation by you and grandfatherly attitude. But to me you are wrong.
— Lakshmi Subramanian (@lakhinathan) April 17, 2018
सेक्स फॉर डिग्री प्रकरणामुळे तामिळनाडूत एकच खळबळ उडाली आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी लैंगिक संबंध ठेवावे लागतील, अशी 'ऑफर' विरुधुनगरमधील देवांग आर्ट कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका निर्मला देवी यांनी चार विद्यार्थिनींना दिली होती. याबद्दलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आणि याप्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी असल्यानं तामिळनाडूत एकच खळबळ उडाली. त्यामुळेच याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती.