मी माहेरी (पाकमध्ये) जाणार नाही म्हणजे नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:51 AM2023-07-22T05:51:18+5:302023-07-22T05:51:58+5:30
सीमा हैदर; भारताने तुरुंगात टाकले तर तिथे राहीन
नॉयडा : भारतीय अधिकाऱ्यांनी मला तुरुंगात टाकले तर मी तिथे राहीन. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाणार नाही, असे भारतात अवैधरित्या प्रवेश केलेल्या सीमा हैदरने शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. ती म्हणाली की, उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) बड्या अधिकाऱ्यांनी माझी दोन दिवस चौकशी केली. त्यांना माझ्यावर संशय होता. पण मी जीवनकहाणी तसेच भारतात कशा रितीने आले हे सारे न लपवता त्यांना सांगितले आहे.
सीमा हैदर म्हणाली की, मला भारताचा व्हिसा मिळत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने खरी ओळख लपवून मला नेपाळमार्गे भारतात यावे लागले. मी हे सारे धाडस फक्त प्रेमासाठी केले आहे. तिने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून मी सचिन मीना याला आपला पती मानत असल्याने करवा चौथचे व्रत केले होते. पाकमध्ये असतानाही मी कुंकू लावत असे. (वृत्तसंस्था)
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
nअवैध विदेशी नागरिकाची ओळख पटविणे तसेच त्याला मायदेशी परत पाठविणे या गोष्टींचा निर्णय इमिग्रेशन विभागातर्फे घेण्यात येतो. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
nमायदेशात पाठविण्यासाठी १५ ते ६० दिवसांचा कालावधी लागू शकतो.
होऊ शकतो पाच ते
सात वर्षांचा कारावास
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सीमा हैदरची दोन दिवस चौकशी केली. तिच्याविरोधात कोणते पुरावे मिळाले हे अद्याप पोलिसांनी उघड केलेले नाही. भारतात अवैध प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला पाच ते सात वर्षांचा कारावास होऊ शकतो. जर सीमा हैदर पाकिस्तानात परत गेली तर तिथे तिच्यावर कडक कारवाई होऊ शकते.