हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारमध्ये भाजपला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर संयुक्त निवेदन जारी करीत भाजप नेतृत्वावर तोफ डागणाऱ्या चार ज्येष्ठ नेत्यांपैकी दोघांनी लालकृष्ण अडवाणींपासून अंतर राखत रा. स्व. संघाशी जवळीक साधली आहे. माजी पक्षाध्यक्ष खा. डॉ. मुरली मनोहर जोशी हे शुक्रवारी नागपूरला जात संघ नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. अन्य तीन नेत्यांसह डॉ. जोशी यांनीही संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका केली होती. म्हाताऱ्या तुर्कांपैकी एक असलेले खा. शांताकुमार यांनी आधीच नमते घेतले असून गेल्या आठवड्यात निवेदन जारी करीत पक्षाने बिहारमधील पराभवाबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केले. शांताकुमार हे हिमाचलचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी अडवाणींना दूर सारत बंडाचा प्रयत्न निष्फळ ठरल्याचे संकेत दिले आहे. जोशींनी नागपूरदरबारी हजेरी लावण्याची तयारी केली असताना बिहारचा मुद्दा मागे पडल्याचे सूचित केले आहे. जोशी आणि शांताकुमार हे संघ नेतृत्वाच्या निकटस्थ मानले जातात. २००९ मध्ये पाकिस्तानभेटीत जिना यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यापासून संघाने अडवाणींना दूर सारले आहे. अडवाणी भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे संघाने मोदींच्या रूपाने नवा नेता शोधला. अडवाणी त्यानंतर अडगळीत पडले. भाजपच्या नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारताना चार ज्येष्ठ नेत्यांनी हातमिळवणी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते. आता असंतुष्टांमध्येच फूट पडल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. जोशी यांना सध्याच्या मोहिमेपासून दूर ठेवण्यात मुख्य भूमिका बजावल्याचे मानले जाते. अडवाणी हे असंतुष्टांच्या कारवायांच्या केंद्रस्थानी असू नये. त्यांच्याकडून मोदी सरकारवर थेट किंवा अप्रत्यक्ष हल्ला केला जाऊ नये यासाठी संघाने प्रयत्न चालविले आहेत. नागपुरात शुक्रवारी डॉ. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम होत आहे. त्या दरम्यान ते संघनेत्यांना भेटणार आहेत.मोठ्या कटाची शंका...चार ज्येष्ठ नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी करण्यात खोलवर रुजलेला कट असावा असे भाजप आणि संघाच्या नेतृत्वाला वाटते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना पदावरून हटविणे एवढाच त्यामागे हेतू नसून मोदी सरकारला कमकुवत करण्याचाही डाव असावा, असे मानले जाते. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीच या निवेदनाचा मसुदा तयार केला होता. सिन्हा यांनी थेट पुढाकार घेत असंतुष्टाच्या कारवायाचे नेतृत्व केले. त्यांनी निवेदन प्रसिद्धी माध्यमांना देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या मोदींच्या निकटस्थ मानले जाणारे नितीन गडकरी यांनी असंतुष्टाच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात भरीव भूमिका बजावतानाच पक्षाला योग्य मार्गावर आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत.पुन्हा राममंदिर?संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच शहा यांनी पक्षाच्या मार्गदर्शक मंडळाची बैठक बोलावणार असल्याचे संकेत दिले आहेत. या महत्त्वाच्या बैठकीसाठी धोरणात्मक दस्तऐवज तयार केले जात आहे. राममंदिराच्या मुद्यावर मार्गदर्शक मंडळाचे मत जाणून घेतले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
ज्येष्ठ नेत्यांचे बंड थंडावणार
By admin | Published: November 27, 2015 3:23 AM