पाकिस्तानने पाडल्याचा दावा केलेल्या लढाऊ विमानानेच आकाशात झेप घेतली तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 09:08 AM2019-10-09T09:08:20+5:302019-10-09T09:11:03+5:30
भारतीय हवाई दलाला काल 87 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर एअर शोचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटवर हल्ला चढविला होता. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने अमेरिकेने दिलेली एफ-16 लढाऊ विमाने भारतात घुसवली होती. यावेळी झालेल्या लढाईत पाकिस्तानने भारताचे सुखोई-30 हे विमान पाडल्याचा दाला केला होता. मात्र, हवाई दलाने पाकिस्तानला तोंडघशी पाडले आहे.
भारतीय हवाई दलाला काल 87 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तीन मिराज 2000 आणि दोन सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमाने सहभागी झाली होती. महत्वाचे म्हणजे यामध्ये एक तेच सुखोई-30 एमकेआई (एव्हेंजर-1) विमान होते जे पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.
हवाई दलाने हेच विमान आकाशात झेपावत पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडला. हवाई दलाने सांगितले की, पाकिस्तानचा भारताचे विमान पाडल्याचा दावा खोटा होता. खरे हे आहे की भारतानेच पाकिस्तानचे एफ 16 विमान पाडले होते. हा पराक्रम रशियामध्ये बनलेल्या मिग-21 बायसन या विमानाने केला होता.
हिंडन हवाई तळावर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह बालाकोट एअरस्ट्राईकमध्ये सहभागी असलेल्या सर्व पायलटांनी मिग लढाऊ विमाने चालविली. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.
राफेलही ताफ्यात
दसऱ्याच्या मुहूर्तावर शक्तिशाली लढाऊ विमान असलेल्या राफेलमधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जवळपास 35 मिनिटं या विमानातून प्रवास केला असून, लवकरच हे राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. फ्रान्समधल्या बोर्डोक्स येथील विमान तळावर हवाई दल प्रमुखांच्या उपस्थितीत राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला.