नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे. जगभरात आतापर्यंत ६५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 86 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात 24 तासामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 9,887 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,36,657 झाली होती. यामध्ये 24 तासांत 294 रुग्णांनी आपला जीव गमावला. ज्यामुळे मृतांची संख्या 6,642 वर पोहोचली आहे. देशात गेल्या तीन दिवसांत सतत रुग्णांचे सर्वाधिक आकडे समोर येत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. त्यातच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR)च्या अंतर्गत असणारे राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र (NRCE)मधील भारतीय वैज्ञानिकांना कोरोनावर मात करण्यासाठी हर्बल वनस्पती परिणामकारक ठरेल असा दावा करण्यात आला आहे. हर्बल वनस्पतीमध्ये काही असे संयुगे (कंपाऊंड) सापडले आहे, ज्यामध्ये कोरोनाव्हायरसवर उपचार करण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हर्बल वनस्पतीपासून तयार होणारं रस कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांसाठी संजीवनी ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एनआरसीईचे अधिकारी बीएन त्रीपाठी यांनी सांगितले की, एनआरसीईच्या वैज्ञानिकांनी आतापर्यत विविध व्हायरसवरील उपचारासाठी औषधं तयार केली आहे. तसेच हर्बल वनस्पतींचा वापर देशात अनेक आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी केला जात असल्याचे बीएन त्रीपाठी यांनी सांगितले.