IDBI Bank: LIC नंतर आता 'या' सरकारी बँकेचे होणार खासगीकरण, 2021मध्येच झाली होती घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 09:37 PM2022-04-06T21:37:34+5:302022-04-06T21:37:43+5:30
IDBI Bank: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी 2021 मध्येच या बँकेच्या खासगीकरणाची घोषणा केली होती.
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात अनेक सरकारी संस्थांचे खासगीकरण करण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच LICमधील एक मोठा हिस्सा विकण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता सरकारने IDBI Bank चे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याची प्रक्रिया सुरू होणार असून, मे महिन्यापर्यंत अनेक महत्वाची अपडेट समोर येऊ शकतात.
2021 मध्येच झाली होती घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांनी फेब्रुवारी 2021 च्या अर्थसंकल्पात IDBI बँकेसह अजून दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. पण, कोरोनामुळे ही खासगीकरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, ही माहिती समोर येताच बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बुधवार IDBIचे शेअर्स 7.85% वाढून 48.75 रुपयांवर बंद झाले.
मे महिन्यात बोली लागण्याची शक्यता
कोरोना परिस्थिती सुधारली आहे, त्यामुळेच आता IDBI बँकेच्या खासगीकरण्याची प्रक्रिया केव्हाही सुरू होऊ शकते. सरकारला चांगल्या किमतीवर ही बँक विकायची आहे, त्यामुळे आतापासूनच याच्या व्हॅल्यूएशनवर काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार मे महिन्यात बिड्स म्हणजेच एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoIs) आमंत्रित करण्याचा विचार करत आहे.
IDBI बँकेत सरकार-LIC चा वाटा
सध्या IDBI Bank मध्ये भारत सरकारचा 45.48% आणि भारतीय जीवन बीमा निगम (LIC)चा 49.24% वाटा आहे. यानुसार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या IDBI Bank मध्ये सरकारचा 94% पेक्षा अधिकचा वाटा आहे. सध्या एलआयसी IDBI Bank ची प्रमोटर असून, बँकेचे मॅनेजमेंट कंट्रोलही त्यांच्याकडे आहे.
किती टक्के वाटा विकणार?
सरकार IDBI बँकेतील आपला संपूर्ण 45.48 टक्के वाटा विकण्याच्या तयारीत आहे. LIC च्या बोर्डाने एक प्रस्ताव पास केला आहे, ज्यानुसार तेदेखील बँकेतील आपला वाटा कमी करू शकतात. परंतू, सरकार गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी यात काही बदल करू शकते. यावर नेमका काय निर्णय होईल, हे येणाऱ्या काळात कळेल.