लखनौ - अयोध्येत प्रभू श्रीराम यांची 221 मीटर उंचीची मूर्ती उभारण्यात येणार आहे. शरयू नदी किनारी ही मूर्ती उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यासाठी, मराठी कलाकार आणि प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांनीच साकारलेल्या मूर्तीची प्रतिकृती वापरण्यात येणार आहे. त्यामुळे ही प्रभू श्रीराम यांची ही मूर्ती शिवस्मारकापेक्षाही उंच मूर्ती ठरणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन श्रीराम यांच्या मूर्तीची घोषणा केली. प्रभू श्रीराम यांची विशाल मूर्ती शरयू नदीच्या किनारी बसविण्यात येईल, या मूर्तीची उंची साधारण 221 मीटर उंच असेल, असे या ट्विटरवर म्हटले आहे. सोबतच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यानच योगी सरकारने ही घोषणा केली आहे. त्यामुळे एकप्रकारे उद्धव ठाकरेंच्या राम मंदिर मागणीच्या मुद्द्याला शह देण्याचा प्रयत्न योगी सरकारने केलाय, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दरम्यान, यापूर्वी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी असे या पुतळ्याला नाव देण्यात आले आहे. तर, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत असून या स्मारकाची उंची 210 मीटर ठेवण्यात येणार आहे. मात्र, आता योगी सरकारने 221 मीटर उंच मूर्ती उभारण्याचे जाहीर केल्यानं जणू मूर्तींच्या उंचीची स्पर्धाच सुरू आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर 221 मीटर उंच म्हणजेच ही मूर्ती शिवस्मारकापेक्षाही मोठी ठरणार आहे.