कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणात दिल्लीतील सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली आहे. विशेषकरून आपचे अनेक नेतेच केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता वर्तवत आहेत. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यास दिल्लीचं मुख्यमंत्रिपद कोण सांभाळणार, तसेच आम आदमी पक्षाचं प्रमुखपद कोण सांभाळणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून या आपातकालीन परिस्थितीत पक्षाची कोअर टीम अरविंद केजरीवाल यांच्या काही विश्वासू आणि निकटवर्तीय नेत्यांशी सल्लामसलत केली जात आहे. यामध्ये काही आमदार आणि सल्लागारांच्या टीमला समाविष्ट करण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत कुठला नेता दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतो, याची चर्चा केली जात आहे.
आम आदमी पक्षासमोरील मोठी अडचण म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय असलेले मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हेसुद्धा तुरुंगात आहेत. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांचा पर्याय म्हणून आम आदमी पक्षाकडे खूपच मर्यादित पर्याय उरले आहेत. जे पर्याय उरले आहेत त्यामध्ये गोपाल राय यांचं नाव आघाडीवर आहे. गोपाल राय हे रामलीला मैदानावरील आंदोनापासून केजरीवाल यांच्यासोबत आहेत. गोपाल राय हे दिल्ली आपचे संयोजक आणि पक्षाच्या शक्तिशाली पॉलिटिकल अफेअर्स समितीचे सदस्यसुद्धा आहेत.
इतर दावेदारांमध्ये राम निवास गोयल आणि आपच्या आघाडीच्या महिला नेत्या आतिशी यांच्या नावांचीही चर्चा होत आहे. आधी भाजपाचे आमदार असलेले रामनिवास गोयल हे २०१४ मध्ये आम आदमी पक्षात आले होते. सध्या ते दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तर आतिशी यांची आपने शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर सरकारमधील बहुतांश जबाबदाऱ्या त्यांच्याकडेच सोपवण्यात आल्या होत्या. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा अरविंद केजरीवाल हेच घेणार आहेत.
आम आदमी पक्षासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा आपचं संयोजकपद हे महत्त्वाचं आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यास त्यांच्या जागी त्यांच्या एवढ्याच तुल्यबळ नेत्याची आवश्यकता आम आदमी पक्षाला भासणार आहे.