गुवाहाटी : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) आसाममध्ये हाेत असलेल्या विराेधाचा धागा पकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माेदी सरकारला लक्ष्य केले. आसाममध्येकाँग्रेसची सत्ता आल्यास ‘सीएए’ कायदा लागू करणार नसल्याचे जाहीर केले.आसाममध्ये मार्च- एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आसामच्या नागरिकांसाठी कळीचा मुद्दा असलेल्या विषयाला राहुल गांधी यांनी हात घातला. आसाममध्ये एका प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले, आम्ही गळ्यात घातलेल्या रुमालावर ‘सीएए’ लिहिले आहे. त्यावर क्राॅस केलेले आहे. हा कायदा काहीही झाले तरी आम्ही लागू हाेऊ देणार नाही. ‘हम दाे, हमारे दाे’वाल्यांनी हे नीट ऐकून घ्यावे, असा इशारा त्यांनी दिला. आसाममधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनाही किमान भत्ता वाढवून देण्याचेही आश्वासन दिले. गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून हा पैसा येईल. कारण मळ्यांची मालकी त्यांच्याकडे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आसामला आसामचाच मुख्यमंत्री हवा असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. याशिवाय आसाम कराराचेही काटेकाेरपणे पालन करू, असेही राहुल गांधी म्हणाले. (वृत्तसंस्था)
‘सीएएची अंमलबजावणी केरळात नाही’- नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याची (सीएए) अंमलबजावणी केरळ करणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी थिरूवनंतपुरम येथे केला. - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड-१९ लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली की सीएएची अंमलबजावणी केली जाईल, असे विधान केल्यावर विजयन यांनी माकपच्या राज्यपातळीवरील दौऱ्याचे उद्घाटन करताना म्हटले की, “आम्ही सीएएबद्दलची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. आमचे सरकार सीएएसारखा कायदा राबवू देणार नाही.” - गुरुवारी शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सभेत बोलताना म्हटले होते की, देशात काेरोनाचा फैलाव झाल्यामुळे सीएएची अंमलबजावणी स्थगित केली होती. कोविड-१९ लसीकरण प्रक्रिया पूर्ण होताच सीएएअंतर्गत नागरिकत्व बहाल करण्यास सुरुवात होईल.