श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अब्दुल राशिद डार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत प्रक्षोभक विधान केले आहे. जर काँग्रेस सत्तेत आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अटक केली जाईल. त्यानंतर त्यांना फासावर लटकवले जाईल, असा प्रक्षोभक दावा त्यांनी केला आहे. शुक्रवारी उत्तर काश्मीरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना डार यांनी हे वादग्रस्त दावा केला आहे. (If Congress comes to power, Narendra Modi will be arrested and hanged, Congress leader's provocative claim)
राशिद म्हणाले की, कलम ३७० ही आमच्यासाठी एक मोठी शक्ती होती. मात्र भाजपाने हे कलम रद्द केले. सध्या सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये येईल, तेव्हा सर्वप्रथम नरेंद्र मोदींना अटक करण्यात येईल. त्यानंतर त्यांना फासावर लटकवण्यात येईल.
यावेळी काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर म्हणाले की, जर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले तर ते ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आलेला निर्णय बदलतील. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या जनतेकडून काहीही हिरावून घेतलेले नाही. उलट काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी जनतेला काही विशेषाधिकार दिले होते. मीर यांनी सांगितले की, कलम ३७० च्या बाजूने असलेल्या काँग्रेसच्या कलाचा भाजपाने फायदा उचलला. काँग्रेसचा याची किंमत मोजावी लागली. मात्र आमच्या पक्षाने आपली भूमिका बदलली नाही.
दरम्यान, अब्दुल राशिद डार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानकारक टिप्पणी करणारे काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल राशिद डार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. भाजपाचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी सांगितले की, काँग्रेसला संपूर्ण देशातून नाकारले गेले आहे. काँग्रेसमध्ये केवळ अल्ताफ ठाकूर यांच्यासारखेच लोक असू शकतात. दिवसा स्वप्ने पाहणारेच पंतप्रधान मोदींना फाशी देण्याचा दावा करू शकतात, असा टोला त्यांनी लगावला.