एफ-१६ विमाने घेतल्यास आर्थिक निर्बंध नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 04:29 AM2018-10-21T04:29:45+5:302018-10-21T04:29:51+5:30
तुम्ही आमच्याकडून एफ-१६ पद्धतीची लढाऊ विमाने विकत घेतल्यास आम्ही तुमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार नाही, अशी आॅफर अमेरिकेतर्फे भारताला देण्यात आली होती
नवी दिल्ली : तुम्ही आमच्याकडून एफ-१६ पद्धतीची लढाऊ विमाने विकत घेतल्यास आम्ही तुमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार नाही, अशी आॅफर अमेरिकेतर्फे भारताला देण्यात आली होती; पण ती भारताने नाकारली असल्याचे समजते. भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्रे विकत घेतल्याने अमेरिका भारतावर आर्थिक निर्बंध घालण्याच्या विचारात आहे.
रशियाकडून ही क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा करार भारताने केल्यानंतर लगेचच अमेरिकेतर्फे एफ-१६ व एफ-१८ पद्धतीची अत्याधुनिक लढाऊ विमाने घेण्यासाठी आॅफर देण्यात आली होती. अर्थातच ही अधिकृत आॅफर नव्हती, तर केवळ तसे सुचविण्यात आले होते; पण ती घेतल्यास अमेरिका तुमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार नाही, असेही सांगितल्यामुळे ती केवळ आॅफरच नव्हे, तर एका अर्थाने धमकीच होती.
पाकिस्तानला अमेरिकेने यापूर्वीच एफ-१६ विमाने दिली आहेत. त्यामुळे भारताला ती नको आहेत. त्यातील अत्याधुनिक दर्जाची विमाने देण्याची आणि भारतात त्यांचे उत्पादन करण्यासाठी भागीदारीची तयारीही अमेरिकेने दर्शवली होती. पण रशियाकडून घेण्यात येणाऱ्या एस-४00 क्षेपणास्त्रांना ती पूरक नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. त्यामुळे भारताने ती विकत घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले.
रशियाशी क्षेपणास्त्रांबाबत झालेला करार आणि इराणकडून होणारी क्रूड आॅईलची खरेदी यामुळे अमेरिका सध्या भारतावर नाराज असून, त्यामुळेच तेथील कॅटसा या कायद्याच्या आधारे आर्थिक निर्बंधांची भाषा करीत आहे. रशिया व इराणशी भारताने कोणतेही करार करू नयेत, यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव आणू पाहत आहेत. भारताकडून रशियाला कोणत्याही प्रकारे पैसा मिळू नये, असा त्यांचा प्रयत्न आहे.
>सीतारामन यांचा दौरा
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस हे मात्र भारतावर आर्थिक निर्बंध घालण्याच्या विरोधात आहेत.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन डिसेंबर महिन्यात अमेरिकेला जाणार आहेत. त्या तिथे मॅटिस यांची भेट घेतील, असे सांगण्यात येते. मात्र, मॅटिस यांच्या भारत समर्थनाच्या भूमिकेमुळे ते तेव्हापर्यंत संरक्षणमंत्रीपदी राहतील का, याविषयी साशंकता आहे.