पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय घेईन महिलांना आरक्षण देण्याचा; राहुल गांधी यांनी दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:50 AM2021-11-08T08:50:08+5:302021-11-08T08:50:28+5:30
राहुल गांधी यांनी तमिळनाडूतील महिलांच्या एका गटासाठी दिवाळीनिमित्त दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी मेजवानीचे आयोजन केले होते. त्यावेळी या महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
नवी दिल्ली : मी पंतप्रधान झालो तर माझा पहिला निर्णय महिलांना आरक्षण देण्याचा असेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी तमिळनाडूतील महिलांच्या एका गटासाठी दिवाळीनिमित्त दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी मेजवानीचे आयोजन केले होते. त्यावेळी या महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. त्याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर झळकविला आहे.
तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या गोष्टीची शिकवण द्याल या एका महिलेने विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, मी माझ्या मुलांना मानवतेची शिकवण देईन. त्या मूल्यांमुळे व्यक्तीची समज वाढते. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. या मेजवानीप्रसंगी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील उपस्थित होत्या.
मेजवानीत होते छोले भटुरे
यंदा झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात राहुल गांधी यांनी मुलागूमुडू येथील सेंट जोसेफ शाळेला भेट दिली होती. तिथे व्यायाम करतानाची छायाचित्रे त्यावेळी प्रसिद्ध झाली होती. याच शाळेत काम करणाऱ्या महिलांना त्यांनी दिवाळीनिमित्त मेजवानीचे आमंत्रण दिले होते. या मेजवानीत छोले भटुरेचाही समावेश होता.