PM मोदी जाऊ शकतात तर भारतीय संघ का नाही?; चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन तेजस्वी यादवांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:28 PM2024-11-29T16:28:42+5:302024-11-29T16:31:13+5:30
भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी भाष्य केलं आहे.
Tejashwi Yadav: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यांच्यातील वादामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघालापाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुनच आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. शेजारी देशांत जाऊन क्रिकेट खेळण्यावर आक्षेप का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव हे देखील व्यावसायिक क्रिकेटपटू होते.
पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तानला जाणार नाही असे बीसीसीआयने आयसीसीला स्पष्ट केलं आहे. तेजस्वी यादव यांनी मात्र ही भूमिका योग्य नसल्याचे स्पष्टपणे म्हटलं आहे. खेळ आणि राजकारण यांची सांगड घालणे योग्य नसल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने विजयाच्या भावनेने पाकिस्तानचा दौरा करावा, असं तेजस्वी यादव म्हणाले. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाऊ शकतात, तर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात का जाऊ शकत नाही, असाही सवाल यादव यांनी केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरु असलेल्या वादावर तेजस्वी यादवला माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "खेळ आणि राजकारण याला एकत्र करणं योग्य नाही. आपल्याला जायला हवं. इतर संघांनी भारतात यावे. ऑलिम्पिकमध्ये सगळेच सहभागी होत नाहीत का? भारताने पाकिस्तानात का जाऊ नये? आक्षेप काय आहे? पंतप्रधान तिथे बिर्याणी खायला जाऊ शकत असतील, तर भारतीय संघ जात असेल तर हे चांगले का नाही?," असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला.
भारताने पाकिस्तानात संघ पाठवण्यास नकार दिल्यानंतर या प्रतिक्रिया येत आहेत. आयसीसीसीने २९ नोव्हेंबर रोजी मोठ्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकारी सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीपूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी आयसीसीला सांगितले की ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडलचा स्वीकारणार नाहीत. तसेच पीसीबीने बैठकीत या पर्यायावर चर्चा न करण्यास सांगितले.
दरम्यान, पीसीबीने हायब्रीड मॉडेलला विरोध करत आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या मॉडेलचा अर्थ भारताला प्राधान्य देणे असल्याचे पीसीबीचे म्हणणं आहे. दुसरीकडे, भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणे शक्य नाही. भारताला या स्पर्धेतून वगळल्यास पाकिस्तानचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.