फास्टॅग नसल्यास भरावा लागेल दुप्पट टोल, उद्यापासून देशभर होणार अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 05:43 AM2021-02-15T05:43:54+5:302021-02-15T05:44:33+5:30
fastag : महामार्गांवर टोलनाक्यांच्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी ही स्वयंचलित यंत्रणा लागू करण्यात आली.
नवी दिल्ली : ज्या वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर नसेल त्या वाहनधारकांना १६ फेब्रुवारीपासून दुप्पट टोल द्यावा लागेल, असा निर्णय केंद्राय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने घेतला. वाहनावर फास्टॅग स्टिकर लावण्याची मुदत सोमवारी, १५ फेब्रुवारीला संपत आहे.
महामार्गांवर टोलनाक्यांच्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी ही स्वयंचलित यंत्रणा लागू करण्यात आली. १ जानेवारीपासून वाहनावर फास्टॅग स्टिकर लावण्याचे निर्देश दिले होते. तर १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु आता पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून ज्या वाहनांवर स्टिकर नसेल, त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारला जाणार आहे.
असे आहेत नवे नियम
- वाहनचालकांनी ताशी २५ ते ३० किमी या वेगात टोलनाक्यावरील फास्टॅग मार्गिकेवर प्रवेश करावा
- रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग पाहून त्याची पडताळणी केली जाईल
- त्यानंतर वाहनाला पुढे जाता येईल
- मार्गिकेतून बाहेर पडताना अधिक वेळ लागल्याल बूम बॅरियर वाहनावर कोसळेल
- पडताळणी झाली नसल्यास
वाहनधारकाने मार्गिकेतून वाहन बाजूला घेत टोलपावती घ्यावी
- फास्टॅग वैध नसल्यास दुप्पट टोलआकारणी केली जाईल
यापुढे ‘फास्टॅग’ला मुदतवाढ नाही - गडकरी
नागपूर : टोल नाक्यांवर आवश्यक असलेल्या ‘फास्ट टॅग’ प्रणालीला यापूर्वी दोन-तीन वेळा मुदतवाढ दिली. बहुतांश महामार्गांवर हा प्रयोग ८० ते ९० टक्के यशस्वी झाला. आता कुठल्याही स्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.