नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यावरून भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध सुरूच राहिला तर याचा फायदा निवडणुकीवेळी भाजपाला होईल, असे ट्विटरच्या माध्यमातून सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
"जास्तकरून विरोधी पक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. याचा फायदा भाजपाला निवडणुकीवेळी मिळेल. असाच विरोध सुरू राहिला तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'श्री 420' पराभूत होईल." असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. दरम्यान, या ट्विटच्या माध्यमातून सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता.
आणखी बातम्या...(दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप राबविणार 'महाराष्ट्र पॅटर्न')(दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 8 फेब्रुवारीला मतदान, तर 11 रोजी मतमोजणी)(भाजपाला केजरीवालांची भीती का वाटते?, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...)(...तर लवकरच भारत भाजपामुक्त होईल; बड्या नेत्याकडून भाजपाला घरचा आहेर)(जेएनयू दोन वर्षे बंद ठेवून तिथे ''स्वच्छता अभियान'' राबवा, सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्ला)