पटेलांचा पुतळा उभारता येतो, मग राम मंदिरासाठी कायदा का करता येत नाही?- संघ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:56 PM2018-12-03T16:56:47+5:302018-12-03T17:00:31+5:30
राम मंदिराच्या मुद्यावरुन संघ आक्रमक
मुंबई: वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, मग राम मंदिरासाठी कायदा का केला जाऊ शकत नाही?, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विचारण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सभेत संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी हा प्रश्न विचारला. गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्यासह अनेक हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर मग भव्य राम मंदिरासाठी कायदा संमत का केला जात नाही?, असा प्रश्न होसबळे यांनी सभेला संबोधित करताना विचारला. याआधी संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी कायदा करण्याची मागणी भागवत यांनी केली होती. आता होसबळे यांनी संघाच्या याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.
दत्तात्रय होसबळे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करताना पी. व्ही. नरसिंह राव यांच्या विधानाचा संदर्भ दिला. 'वादग्रस्त जमिनीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यास ती जमीन मंदिराच्या उभारणीसाठी दिली जाईल, अशी माहिती पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. त्यानंतर उत्खननात मंदिराचे अवशेषदेखील सापडले. मात्र आता या प्रकरणी निकाल देण्यास न्यायालय टाळाटाळ करत आहे. या सुनावणीला प्राधान्य द्यावं, असं न्यायालयाला वाटत नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्वतंत्र घटनापीठाची स्थापना केली आहे. मात्र प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणावर अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही,' असं म्हणत होसबळे यांनी न्यायालयाकडून होणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली.