राममंदिराच्या आड याल तर हज यात्रा रोखू, भाजपा आमदाराचे प्रक्षोभक वक्तव्य
By admin | Published: July 13, 2017 09:03 PM2017-07-13T21:03:59+5:302017-07-13T21:03:59+5:30
देशातील मुस्लिमांनी राम मंदिर बांघण्याच्या आड येऊ नये, मुस्लिमांनी जर राम मंदिर बांधण्यास विरोध केला तर आम्ही त्यांना
Next
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 13 - भाजपा नेत्यांकडून मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची मालिका सुरूच आहे. देशातील मुस्लिमांनी राम मंदिर बांघण्याच्या आड येऊ नये, मुस्लिमांनी जर राम मंदिर बांधण्यास विरोध केला तर आम्ही त्यांना मक्का - मदिनेस जाऊ देणार नाही, असे विखारी वक्तव्य भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार बृजभूषण सिंह उर्फ गुड्डू राजपूत यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशमधील चरखारी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या बृजभूषण सिंह यांनी फेसबूक पोष्टमधून हे आक्षेपार्ह विचार मांडले आहेत. ते म्हणतात, "येत्या काळात आम्ही सर्व 100 कोटी हिंदू मिळून निश्चितपणे राम मंदिर बांधू. हिंदूंनी आता राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला पाहिजे. जर राम मंदिराच्या बांधकामात मुस्लिमांनी अडथळा आणला. तर त्यांनासुद्धा मक्का आणि मदिनेस जाण्यापासून रोखण्याचे काम हा गुड्डू राजपूत करेल. आम्ही त्यांच्याविरोधाच बोलत नाही. प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांना साथ देतो. पण ही मंडळी हिंदूंच्या प्रत्येक सणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात." या संदर्भातील वृत्त नवभारत
टाइम्सने प्रकाशित केले आहे.
सरकार हज यात्रेवर सब्सिडी देते. आम्ही यांच्या यात्रेस विरोध करत नाही. तर हजला जाणाऱ्यांचे फुलांच्या माळा घालून स्वागत करतो. जर आम्ही त्यांच्याशी असे वागत असू तर आमचे आराध्य श्री राम यांचे मंदिर बांधू देणे हे यांचे कर्तव्य आहे, असेही भाजपा आमदारांनी पुढे म्हटले आहे.
याआधी तेलंगणातील भाजपा आमदाराने बंगालमधील तणावावरून असेच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. बंगालमधील पेटलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भाजपा आमदार राजा सिंह यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. "बंगालमधील हिंदूंकडे सध्या दोनच रस्ते आहेत. एक म्हणजे काश्मीरप्रमाणे नपुंसक बनून तेथून पळ काढायचा किंवा संघटित होऊन 2002च्या गुजरात दंगलीची बंगालमध्ये पुनरावृत्ती करावी." असे या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये राजा सिंह म्हणाले होते.