ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - ' ज्यांना बीफ (गोमांस) खायचे असेल त्यांनी पाकिस्तानात किंवा जगात इतर कुठेही जावे' असे विधान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'गोवंश हत्या बंदीचे' समर्थन केले. ' हा फायदा किंवा तोट्याचा नव्हे तर हा श्रद्धेचा, विश्वासाचा मुद्दा आहे. बीफ खाल्ल्याशिवाय ज्यांचा जीव जात असेल त्यांनी खुशाल पाकिस्तान किंवा आखातात नाहीतर जगातील कुठल्याही भागात जावे' असे नक्वींनी सुनावले.
महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडने गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला असून राज्यांतील या बंदीविरोधात अनेक पक्ष व संघटनांनी आवाज उठवला आहे. ओवेसी बंधूंचा एमआयएम पक्ष त्यावर आघाडीवर आहे. अनेक जण या कायद्याला विरोध करत रोजगाराचा मुद्दा उठवत आहेत तर काही जण त्याला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न करत आहेत. मात्र सरकार या निर्णयावर ठाम आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नक्वी आणि ओवेसी समोरासमोर आले असता नक्वी यांनी या मुद्यावर भाष्य केले. ' गोवंश हत्याबंदी हा हिंदूंसाठी अतिशय संवेदनशील विषय आहे. येथे मुद्दा फायदा वा तोट्याचा नसून श्रद्धेचा आणि आस्थेचा आहे. बीफ खाल्याशिवाय एखाद्याचा जीव जात असेल तर त्यांनी बीफ खाण्यास जिथे बंदी नसेल अशा ठिकाणी जावे' असे नक्वी म्हणाले.