पैशांसाठी खासगी रुग्णालयांकडून सिझेरियन डिलेव्हरी- सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:29 PM2018-12-03T16:29:35+5:302018-12-03T17:35:40+5:30
भारतातील अनेक खासगी रुग्णालयात केवळ पैसे कमावण्यासाठी महिलांची सिझेरियन प्रसूती करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - भारतातील अनेक खासगी रुग्णालयात केवळ पैसे कमावण्यासाठी महिलांची सिझेरियन प्रसूती करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका वर्षात 70 लाख महिलांची प्रसूती झाली असून यातील 9 लाख महिलांची गरज नसताना सिझेरियन प्रसूती करण्यात आली आहे. अहमदाबादमधील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' (IIM-A) ने केलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, गरज नसताना महिलांची सिझेरियन प्रसूती केल्याने लोकांच्या खिशावर भार पडला आहे. तसेच बाळाला स्तनपान करण्यास उशीर झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे नवजात बाळाचं वजन कमी झालं असून अनेकांना श्वास घेण्यास समस्या निर्माण झाली आहे. आयआयएम-एचे सदस्य अंबरिश डोंगरे आणि विद्यार्थी मितूल सुराणा यांनी याबाबत सर्वेक्षण केले आहे.
महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी अनेक जण सरकारी रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयांना अधिक प्राधान्य देतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) च्या 2015-2016 च्या आकडेवारीनुसार, भारतातील खासगी रुग्णालयामध्ये 40.9 टक्के सिझेरियन प्रसूती होते. तर सरकारी रुग्णालयामध्ये 11.9 टक्के प्रसूती करण्यात आली आहे. महिलांची सिझेरियन प्रसूती करण्यामागे केवळ पैसे कमावणे हाच खासगी रुग्णालयाचा हेतू असल्याचं आता अहवालातून समोर आलं आहे. महिलांची नैसर्गिक प्रसूती करताना जवळपास 10,814 रुपये खर्च येता. तर सिझेरियनमध्ये 23,978 रुपये खर्च होत असल्याचं अहवालात म्हटलं आहे.