नवी दिल्ली, दि.3- पंचगव्यावर संशोधन करण्यासाठी देशभरातील 50 संशोधन संस्थांनी आयआयटी दिल्लीकडे आपले प्रस्ताव पाठवले आहेत. स्वरुप संशोधन प्रकल्पाअंतर्गत हे संशोधन येते. स्वरुप हा प्रकल्प (सायंटिफिक व्हॅलिडेशन अॅंड रिसर्च ऑन पंचगव्य) खास गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या संशोधनासाठी तयार सुरु करण्यात आलेला आहे. पंचगव्यामध्ये गायीचे दूध, दही, गोमय, गोमूत्र आणि तूप यांचा समावेश होतो.
आम्हाला सीएसआयआर प्रयोगशाळा, एनआयटी, आयआयटी अशा संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अद्याप कोणत्याही संशोधन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही असे आयआयटी दिल्लीच्या ग्रामविकास आणि तंत्रज्ञान विभागाच्या व्ही. के विजय यांनी स्पष्ट केले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आयआयटी दिल्लीमध्ये स्वरुप वरती विचारमंथन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पंचगव्याचा शेती, कुपोषण, साबण-डासप्रतिबंधक औषधांसारखी ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी कसा उपयोग होईल यावर चर्चा करण्यात आली होती. आता भारतीय गायींचे वेगळेपण आणि परदेशी गायींच्या तुलनेमध्ये त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांची उपयुक्तता याचा अभ्यास करण्याचा विचार सरकारचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यामध्ये केंद्र सरकारने स्वरुप समितीची स्थापना केली. यामध्ये केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांची अध्यक्षस्थानी नेमणूक करण्यात आली. समितीच्या इतर सदस्यांमध्ये सीएसआयआरचे माजी महासंचालक रघुनाथ माशेलकर तसेच सीएसआयआर, आयसीएआर,आयसीएमआरचे सध्याचे संचालक, विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि एनजीओंचा समावेश आहे.
गो-तस्कर समजून 4 जणांना अमानुष मारहाण
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील डुलारिया गावात स्वयंघोषित गोरक्षकांनी गो-तस्कर समजून 4 युवकांना कथित स्वरुपात भररस्त्यात लाथा-बुक्क्या घालून बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियादेखील व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्यांच्यावर गो-तस्करीचा आरोप करण्यात आला आहे त्या चार जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र या चार जणांवर हल्ला करणारे फरार झाले आहेत. गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. स्वंयघोषित गो-रक्षकांद्वारे या युवकांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर दोन्ही गटांविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चारही युवकांना बांधून स्वयंघोषित गोरक्षकांनी सर्वांसमोर त्यांना अमानुष मारहाण केली. मारहाण करताना या युवकांना उठाबशांची शिक्षाही देण्यात आली होती.