बंगळुरू- 'कर्नाटकात जी परिस्थिती होती त्याबद्दल मला जराही आनंद नाही. मी जनतेला खूप वचनं दिली होती. स्पष्ट बहुमत मिळवून मी मुख्यमंत्री होईल अशी माझी इच्छा होती. पण जनतेचा माझ्यावर व पक्षावर तितका विश्वास नाही. लोक करत असलेल्या टीकेची मला जाणीव आहे. मी संधिसाधू आहे असं लोकांना वाटतं. पण माझी बाजू स्पष्ट करण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो आहे, असं कुमारस्वामी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मी संधिसाधू नाही असं म्हणत कुमारस्वामी यांनी त्यांच्यावर होणारा आरोप फेटाळून लावला आहे.
मला अशा पद्धतीने मुख्यमंत्रिपद नको होतं. पण ते आता महत्वाचं नाही. सरकार स्थापन करुन ते चांगल्या प्रकारे चालवणं आत्ता महत्वाचं आहे. सिद्धरामय्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. निवडणुकीच्या आधी ते जे काही बोलले तो भूतकाळ आहे. मी भविष्याकडे पाहतो आहे, असं तुम्ही मुख्यमंत्री बनू शकणार नाही असा सिद्धरामय्या यांचा दावा होता ? या प्रश्नावर उत्तर देताना कुमारस्वामी यांनी म्हटलं. शपथविधीनंतर 24 तासात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्याल का? या प्रश्नाचं उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मी बांधिल आहे. पण भावनेच्या आधारे निर्णय घेऊ शकत नाही. आमचं सरकार युकीचं सरकार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. सरकारी तिजोरीवर खर्चाचा किती भार आहे याची पडताळणी करून आम्ही योग्य निर्णय घेऊ. काँग्रेस पक्षाने जनतेला जी वचनं दिली आहेत ती पूर्ण करायला मी बांधिल आहे, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं.
दरम्यान, कर्नाटकात येत्या बुधवारी काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचं सरकार स्थापन होणार असून कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.