आयएमएप्रमुख मन्सूर खान यांची शरणागती पत्करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 05:37 AM2019-06-24T05:37:54+5:302019-06-24T05:39:32+5:30
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केल्यानंतर आयएमएचे प्रमुख मन्सूर खान यांनी व्हिडिओ फीत जारी करून पोलिसांना शरणगती पत्करण्याची तयारी दाखविली आहे
बंगळुरू : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केल्यानंतर आयएमएचे प्रमुख मन्सूर खान यांनी व्हिडिओ फीत जारी करून पोलिसांना शरणगती पत्करण्याची तयारी दाखविली आहे, तसेच आयएमएच्या पतनाला जबाबदार असलेल्या बड्या व्यक्तींची नावे उघड करण्याचीही तयारी दाखविली आहे. या बड्या लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
ठेवींवर घसघशीत परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांना फसविल्याचा आरोप आयएमए ज्वेल्सवर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आयएमएने गुंतवणुकीवर व्याज दिलेले नाही. काही गुंतवणूकदारांना ध्वनिफीत पाठवून काही राजकारणी आणि गुंडांकडून छळ केला जात असल्याने आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते.
जनतेच्या समर्थनार्थ मला परत यायचे असून, पोलिसांकडे सर्व तपशील देईन, तसेच पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी आहे. पोलीस आणि न्यायालयात मी जबाब देताना सर्वांची नावे उघड करीन. ते सर्व बडे लोक आहेत. ते मला जिवंत सोडणार नाहीत, असे मन्सूर खानने पोलीस आयुक्त आलोक कुमार यांच्या नावे जारी केलेल्या १८ मिनिटांच्या व्हिडिओ फितीत म्हटले आहे. या व्हिडिओची सत्यता आम्ही अद्याप तपासलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. खान यांनी स्वत:चा मोबाईल फोन क्रमांकही दिला आहे. खान हे सध्या दुबईत असल्याचे कळते. आयएमएच्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी खंजीर खुपसला आणि माझा छळ केला. माझ्या कुटुंबियांना लपविण्यास त्यांनी मला भाग पाडले.
भारत सोडण्याची चूक होती; परंतु व्यवस्थापनातील माझ्या स्वत:च्या लोकांनी आणि काही जवळच्या राजकीय व्यक्तींनी माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझा छळ केला. जे काही घडले ते घाईने घडले, असेही खान यांनी यात म्हटले आहे. तथापि, त्यांनी आपला ठावठिकाणा सांगितलेला नाही. १४ जून रोजीच मला माघारी यायचे होते. मी विमानतळावर पोहोचलोही होतो; परंतु तुम्ही जाऊ शकत नाहीत, असे सांगून मला विमानात बसू दिले नाही.