नवी दिल्ली : देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर प्रथमच एका दिवसात रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेल्याने केंद्र सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या पत्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी अशी मागणीही केली आहे.
यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. नरेंद्र मोदींना लिहिलेल्या या पत्रामध्ये असोसिएशनने कोरोनासंदर्भात महत्वाचे मुद्दे मांडले असून त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर चार एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण २४ तासांमध्ये आढळून आले. ही कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे, अशी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनचे साडेतीन लाख सदस्य भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीशी असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
("25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती )
भारत सरकारने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पहिल्या फळीतील कोरोना योद्धे आणि सर्वसामान्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाधितांची ओळख पटवून त्यांना ट्रेस करुन त्यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात ज्या सूचना जारी केल्यात त्याप्रमाणे काम केले जात आहे. तरीही मोठ्या प्रमाणात लोक मास्क न घातला एका जागी गर्दी करतात, कोरोनासंदर्भातील नियम पाळत नाहीत, कोरोना व्हायरसमध्ये नेहमी बदल होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत निष्फळ ठरत असून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचेही इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.
आतापर्यंत देशामध्ये ७ कोटी ९१ लाख व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली असून त्यापैकी ६ कोटी ८६ लाख व्यक्तींना पहिला डोस तर एक कोटी पाच लाख व्यक्तींना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र ज्या वेगाने संसर्ग होत आहे ते पाहता आम्ही तुम्हाला विनंती करतो की लसीकरणाची गती वाढवली पाहिजे आणि १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली पाहिजे. तसेच, सध्या कोरोना नियम न पाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई, मोठ्या प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजनची सुविधा असणारे बेड्स उपलब्ध करुन देणं, आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांचा उत्साह वाढवणं. त्याचप्रमाणे नियमानुसार संपूर्ण उपचार करुन घेणं या गोष्टींवर सध्याच्या काळात भर देणे गरजेचे आहे, असेही इंडियन मेडिकल असोसिएशनने पत्रात नमूद केले आहे.
याचबरोबर, सर्व नागरिकांना घरापासूनच चालत जाता येईल अशा अंतरावर कोरोना लसीकरण केंद्र उपलब्ध करुन दिले पाहिजे. लसीकरणासाठी खासगी क्लिनिक आणि रुग्णालयांचीही मदत घेतली पाहिजे. प्रत्येक डॉक्टरकडे लसीकरणाची सोय असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लसीकरणावर दिसून येईल असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे. तसेच जिल्हा स्तरावर कोरोना लसीकरण टास्क फोर्स टीम तयार करुन त्यामध्ये सरकारी तसेच खासगी व्यक्तींची मदत घेऊन तळागाळातील व्यक्तींपर्यत लसीकरण पोहचवण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. यासाठी असोसिएशन आणि त्यामधील सभासद काम करण्यासाठी तयार आहेत, असेही इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधानांना लिहेलेल्या पत्रात म्हटले आहे.