नवी दिल्ली : भारतासारख्या देशाने लष्करी उपकरणांच्या आयातीवर अवलंबून राहणे हे त्याच्या सामरिक क्षमतेसाठी घातक ठरू शकते, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. संरक्षण सामुग्रीचे स्वदेशात उत्पादन व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आग्रही आहे, असेही ते म्हणाले.
‘डिफकनेक्ट २०२४’ या चर्चासत्रात त्यांनी मंगळवारी सांगितले की, लष्करी सामुग्रीच्या आयातीवर अवलंबून राहिल्याने गतकाळात देशाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. देशात आता १ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण सामुग्रीचे उत्पादन झाले आहे. २०१४ साली हे प्रमाण ४४ हजार कोटी इतके होते.
शस्त्रे, लष्करी उपकरणांची स्वदेशात अधिकाधिक निर्मिती झाली तरच आपण सामरिक क्षमता नीट टिकवून ठेवू शकतो. त्या दिशेने आम्ही प्रयत्न केले व त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले.