आयात होणाऱ्या डाळी विषारी; अन्नसुरक्षा प्राधिकरणाचे तपासणीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:04 AM2018-10-29T05:04:53+5:302018-10-29T06:28:05+5:30

कमी पावसामुळे यंदा पाऊस देशातील डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून डाळींची आयात वाढण्याची शक्यता आहे, पण या आयातीत डाळी विषारी असल्याचे समोर आले.

Imported pulses are poisonous | आयात होणाऱ्या डाळी विषारी; अन्नसुरक्षा प्राधिकरणाचे तपासणीचे आदेश

आयात होणाऱ्या डाळी विषारी; अन्नसुरक्षा प्राधिकरणाचे तपासणीचे आदेश

googlenewsNext

- चिन्मय काळे

मुंबई : कमी पावसामुळे यंदा पाऊस देशातील डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून डाळींची आयात वाढण्याची शक्यता आहे, पण या आयातीत डाळी विषारी असल्याचे समोर आले. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणानेच (एफएसएसएआय) यासंबंधी सखोल तपासणीचे आदेश दिले आहेत.

देशी डाळींचे पीक कमी असले की, केंद्र सरकार म्यानमार, कॅनडा व आॅस्ट्रेलिया येथून डाळ आयात करते. एफएसएसएआयनुसार, प्रामुख्याने कॅनडा व आॅस्ट्रेलिया येथून आयात होणाºया डाळींत ‘ग्लायफोसेट’ हे विषारी रसायन असण्याची भीती आहे. त्यामुळे जिथे-जिथे या डाळींची आयात होते, तेथील अन्न व औषधे प्रशासनाने या डाळींची तपासणी करावी. सर्व प्रादेशिक प्रयोगशाळांनी नमुन्यांची तपासणीचा अहवाल दर १५ दिवसांनी दिल्ली मुख्यालयाला पाठवावा, असे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.

केंद्र सरकारने डाळींची आयात ३ लाख टन इतकी निश्चित केली आहे, पण विदेशी डाळी मोठ्या प्रमाणात बाजारात आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने डाळींच्या आयातीवर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे प्रताप मोटवानी यांनी केली आहे.

लठ्ठपणाला कारणीभूत ‘ग्लायफोसेट’
‘ग्लायफोसेट’ या विषारी द्रव्यामुळे लठ्ठपणा, अल्झायमर, भ्रमिष्टपणा, लकवा यासारख्या आजारांची भीतीही असते. आजकाल लठ्ठपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत.
लठ्ठपणा वाढला की, विदेशी औषधांचा वापर वाढतो. त्यासाठीच ‘ग्लायफोसेट’युक्त डाळी भारतात पाठविल्या जात आहेत, असा आरोप आयातदारांनी केला आहे.

मात्रा निश्चितच नाही
‘ग्लायफोसेट’ची मात्रा किती असावी, हे अन्न सुरक्षा व मानके कायद्यात आजवर निश्चितच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आता घातक रसायन आढळल्यामुळे प्राधिकरणाला जाग आली आहे. त्यामुळे तूर्तास अमेरिकन ‘कोडेक्स’नुसार मात्रा ग्राह्य धरण्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. यामुळे आजवर असे लाखो लीटर घातक रसायन भारतीयांच्या पोटात गेले असण्याची भीती आहे.
 

Web Title: Imported pulses are poisonous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य