मुंबई : दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीतील वाढ या आर्थिक वर्षात कायम राहण्याची शक्यता असून, रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेले प्रयत्न पुरेसे नसल्याचे मत एडलवेस सेक्युरिटीजने अभ्यास अहवालात मांडले आहे.
या अभ्यासानुसार, दैनंदिन गरजेच्याच वस्तूंचा समावेश असलेला किरकोळ महागाई दर सध्या ६.७५ टक्क्यांदरम्यान आहे, पण डिसेंबर २०१८ पर्यंत तो ४.५ टक्क्यांवर व आर्थिक वर्षअखेरीस (मार्च २०१९) ५ टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे. यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू सातत्याने महाग होत जातील.
क्रयशक्ती नियंत्रणात आली की, खरेदी आटोक्यात होऊन रुपया सक्षम होईल, या आशेने रिझर्व्ह बँकेने या वर्षी आतापर्यंत दोन वेळा रेपोदरात पाव-पाव टक्का वाढ केली, पण या दरवाढीनंतरही रुपया १५.२ टक्के घसरला.
अन्य देशांचा विचार केल्यास, अर्जेंटिनाने रेपोदरात ३१ टक्के वाढ केली, पण त्यांचे चलन १०४ टक्के कमकुवत झाले. ब्रिक्स देशांपैकी ब्राझीलने रेपोदरात पाव टक्का घट केली, तरीही त्यांचे चलन १९ टक्के घसरले. रशियाने रेपोदर पाव टक्का कमी केले आणि त्यांचे चलन १३.९ टक्के कमकुवत झाले. दक्षिण आफ्रिकेनेही रेपोदर पाव टक्का कमी केले, तरीही त्यांचे चलन १६.३ टक्के कमकुवत झाले. यावरूनच रुपया सक्षम करण्यासाठी केवळ रेपोदराच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न होत असतील, तर ते अपुरे आहे, असे हा अभ्यास अहवाल सांगतो.