Unique Divorce case : जयपूर येथील कौटुंबिक न्यायालयात एक अनोखी घटना घडली. इथे न्यायालयाच्या आदेशानंतरही पतीने पत्नीला पोटगी न दिल्याने पत्नीने न्यायालयात तक्रार केली आणि कायद्यानुसार पतीला अटक करण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे कालांतराने कोर्टाची तारीख आली अन् पती पत्नीसाठी तब्बल ५५ हजारांची नाणी घेऊन कोर्टात पोहोचला. पण तरीदेखील पत्नीला हे पैसे घेता आले नाहीत. मग न्यायालयाने पुढची तारीख दिली.
दरम्यान, जयपूरच्या हरमाडा भागात राहणाऱ्या दशरथ आणि सीमा यांचा विवाह सुमारे बारा वर्षांपूर्वी झाला होता. मागील पाच वर्षांपासून दोघांमध्ये वेगळे राहण्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. नियमानुसार न्यायाधीशांनी पोटगी निश्चित केली होती, मात्र पती दशरथने दरमहा द्यावयाची पोटगी दिलीच नाही. थकबाकीपोटी ही रक्कम सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली. तरीदेखील दशरथने पैसे न दिल्याने प्रसंगी त्याला अटक करण्यात आली. जामीन मिळाल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला.
तब्बल ५५ हजारांची नाणी घेऊन पती न्यायालयात सोमवारी म्हणजेच १९ जून रोजी कोर्टाची तारीख होती. तेव्हा दशरथ तब्बल ५५,००० रूपयांची नाणी घेऊन कोर्टात पोहोचला. शिवाय त्याने पत्नीने आपला छळ केला असल्याचा आरोपही केला. हे पैसे एक आणि दोन रुपयांच्या नाण्यांमध्ये होते. त्यामुळे या नाण्यांनी सात गोण्या भरल्या होत्या आणि त्यांचे एकूण वजन २८० किलो एवढे होते. हे पैसे आपण घेऊ शकत नाही, असे दशरथची पत्नी सीमाने न्यायालयात सांगितले. पण हे भारतीय चलन असल्याने नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने २६ जूनची तारीख दिली आहे. खरं तर २६ जून रोजी न्यायालयाने दशरथला एक-एक हजार अशी रक्कम आणायला सांगितली आहे. त्यानंतरच पैसे स्वीकारले जातील, असा आदेश दिला आहे. कारण अद्याप एक लाखाहून अधिक रुपयांची थकबाकी आहे.