नवी दिल्ली: पॅन कार्डसाठी अर्ज करताना त्यात वडिलांच्या नावाचा उल्लेख करणं बंधनकारक नसेल, असं आयकर विभागानं म्हटलं आहे. पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा सांभाळ एकट्या आईनं केला असल्यास ती व्यक्ती आईचं नाव अर्जात नमूद करु शकते, असंदेखील आयकर विभागानं म्हटलं आहे. याबद्दल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामुळे अर्जदारांना पॅन कार्डसाठी अर्ज भरताना त्यात सिंगल पॅरेंट मदर असा पर्याय उपलब्ध असेल. यासाठी आयकर विभागानं नियमांमध्ये बदल केला आहे. पॅन कार्डसाठी अर्ज करताना वडिलांचं नाव नमूद करणं बंधनकारक आहे. मात्र 5 डिसेंबरपासून पॅन कार्डचा अर्ज करताना वडिलांच्या नावाचा उल्लेख करणं बंधनकारक असणार नाही. काही व्यक्तींच्या सांभाळ आणि संगोपनात त्यांच्या आईचा मोठा वाटा असतो. अशा व्यक्तींना त्यांच्या वडिलांचं नाव पॅन कार्डवर नको असतं. याउलट आपल्याला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आईचं नाव पॅन कार्डवर लावण्याची त्यांची इच्छा असते. अशा व्यक्तींकडून आलेल्या मागण्या लक्षात घेता, पॅन कार्डसाठी अर्ज करताना वडिलांचं नाव नमूद करणं गरजेचं नसल्याचा निर्णय आयकर विभागानं घेतला आहे.
पॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 7:56 PM