नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत चाललेला असतानाच एक दिलासादायक बातमी शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी या महासाथीची दुसरी लाट येण्याची शक्यता तूर्तास दिसत नाही, असा निर्वाळा ‘सीएसआयआर’ने दिला आहे. (Increased corona infection; But there are no signs of a new wave)कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून व अंतरनियम पाळून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा विश्वासही परिषदेने व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे देशात सध्या या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे की, अन्य काही कारणे त्यामागे आहेत, याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र, तूर्तास तरी कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता दिसत नाही, असे सीएसआयरचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले. दरम्यान, इतर देशांइतके रुग्णवाढीचे प्रमाण भारतात नसल्याचेही तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन केले आणि मास्कच्या वापराबाबत जनजागृती केली तर रुग्णसंख्या आटाेक्यात येऊ शकते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.एका दिवसात २० लाख लोकांना लसदेशात २० लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली. तर देशात शनिवारी कोरोनाचे २४,८८२ नवे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या १ कोटी १३ लाखांवर पोहोचली. महाराष्ट्राची स्थिती -
महाराष्ट्रात शनिवारी १५ हजार ६०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, ८८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२,९७,७९३ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ८११ झाला आहे. राज्यात १ लाख १८ हजार ५२५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शनिवारी दिवसभरात ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण २१,२५,२११ रुग्ण काेराेनामुक्त झाले.
उत्तर प्रदेश आघाडीवर -देशात लसीकरण मोहिमेत उत्तर प्रदेश हे राज्य आघाडीवर असून, तिथे शनिवारी एका दिवसात ३ लाख ३० हजार लोकांना लस देण्यात आली.
आणखी सहा लसी... -- आणखी सहापेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसी भारतात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी दिली.- भारताने कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड या दोन लसी विकसित केल्या असून त्यांचा जगभरातील ७१ देशांना पुरवठा केला आहे.- लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढे ही सुरू ठेवावे, असा सल्लाही आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला.