लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चिनी सैनिकांशी खटके उडण्याच्या ताज्या घटनांनी निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन चीनच्या आक्रमकतेला जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने वाढीव लष्करी कुमक तैनात केली आहे.
माहीतगार सूत्रांनी सांगितले की, सीमेवरील चिनी सैनिकांच्या वाढीव उपस्थितीचा समतुल्य मुकाबला करण्यासाठी आधी राखीव तुकड्यांमधील सैनिक पाठविण्याचा विचार केला गेला; परंतु नंतर नियमित लष्करी तुकड्यांसोबत भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) तुकड्याही तेथे पाठविल्या गेल्या.
सूत्रांनुसार राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे ‘आयटीबीपी’च्या काही तुकड्या तैनात केल्या गेल्या होत्या. तेथील परिस्थिती आता बरीच सुधारली असल्याने त्यापैकी काही तुकड्या पूर्व तिबेटच्या सीमेवर पाठविल्या गेल्या.सीमेवरील सैन्यबळ नेमके किती वाढविले गेले आहे, हे सांगण्यास सूत्रांनी सुरक्षेच्या कारणाने नकार दिला.पूर्व लडाख सीमेवरील पँगाँग सो सरोवराच्या काठी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू असल्याचा समाजमाध्यमांत व्हायरल झालेला सुमारे अडीच मिनिटांचा कथित व्हिडिओ खरा नाही, असा खुलासा भारतीय लष्कराने केला आहे. कर्नल अमन आनंद यांनी म्हटले की, उत्तर सीमेवर अशी कोणतीही ताजी घटना घडलेली नाही.घटनादुरुस्ती विधेयकनेपाळच्या संसदेतकाठमांडू : नेपाळ सरकारने संसदेत रविवारी घटनेत दुरुस्ती करणारे विधेयक मांडले. देशाच्या नकाशात करण्यात आलेल्या बदलला या विधेयकाद्वारे मान्यता मिळवण्याचा त्यामागे उद्देश आहे. हा बदल केल्यापासून भारतासोबत सीमावाद सुरू झाला आहे.कायदा, न्याय आणि संसदीय कामकाजमंत्री शिवमाया तुंबाहंगफे यांनी सरकारच्या वतीने हे विधेयक मांडले. शनिवारी या विधेयकाला मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता. घटनेत ही दुसरी दुरुस्ती असेल.नेपाळने नुकताच देशाचा सुधारित राजकीय आणि प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला. त्यात लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळचे असल्याचा दावा केला आहे. भारताने यावर संतापून प्रतिक्रिया व्यक्त केली व म्हटले की, असे कृत्रिमरीत्या वाढवलेल्या भूभागांवरील दावे कधीही स्वीकारले जाणार नाहीत.