काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:53 AM2019-07-15T04:53:12+5:302019-07-15T04:53:20+5:30
विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.
श्रीनगर : विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काश्मीरमधील एकाही प्रमुख नेत्याने काश्मिरी पंडितांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण आजवर दिलेले नव्हते.
या पंडितांना सुरक्षा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम आम्ही करणार आहोत. या पंडितांची घरे बळकावणाऱ्यांनी आता त्यांना पुन्हा तेथे राहायला येण्यासाठी बोलावले पाहिजे. असे होण्याकरिता फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, तसेच हुरियत नेत्यांनी काश्मिरीमधील इतर लोकांना राजी केले पाहिजे. हे माझे काम नाही तर काश्मीरमधील नेत्यांनी हे करणे अपेक्षित आहे. काश्मिरी पंडितांना त्यांच्याच राज्यात पर्यायी घर, शाळा व सुरक्षा मिळावी इतकाच आमचा प्रयत्न आहे.
काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पुलवामा व अन्य काही ठिकाणांचा आम्ही विचार चालविला आहे. काश्मिरी पंडितांना हव्या त्या ठिकाणी या वसाहती उभारून तेथे त्यांना मोफत घरे देण्यात येतील.
>अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींनी विश्वास गमावला
राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, ओमर असो वा फारुक अब्दुल्ला यांच्या पक्षाला दोन ते अडीच टक्के मतदान होते. मेहबुबा मुफ्ती यांच्या मतदारसंघात फक्त २ टक्केच मतदान झाले. श्रीनगरमध्ये फारुक अब्दुल्ला अगदी कमी मताधिक्याने निवडून येत असत.
पूर्वी तिथे ६ टक्के मतदान होत असे. आता फारुक अब्दुल्ला १० ते १२ टक्के मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. हे सर्व काश्मिरी नेते स्थानिक जनतेचा विश्वास गमावून बसले आहेत. काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे हुरियत नेते मिरवाईज यांनी म्हटले होते. त्याबाबत मी नव्हे तर केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे.