नवी दिल्ली : भारत व चीन यांनी आपापले सैन्य मागे घ्यावे, तसेच सीमेवरील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुमारे पाच मुद्द्यांवर या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या गुरुवारी मॉस्को येथे झालेल्या बैठकीत एकमत झाले. सीमेवरील तणाव दोन्ही देशांच्या हिताचा नाही, हेही या बैठकीत मान्य करण्यात आले.
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) या संघटनेची मॉस्को येथे बैठक सुरू आहे. त्याला उपस्थित असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी एक बैठक घेऊन दोन्ही देशांच्या सीमेवरील स्थितीबद्दल चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून बैठकीतील चर्चेची माहिती दिली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करण्यात आली असून, भारतासाठी तो चिंतेचा विषय आहे. चीनच्या या कृतीने दोन्ही देशांत आजवर झालेल्या करारांचा भंग होत आहे, असा आक्षेप डॉ. एस. जयशंकर यांनी या बैठकीत केल्याचे समजते. सीमेवर सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव का करण्यात आली, याचे कारण चीन देऊ शकलेला नाही. जयशंकर व वांग यी यांच्यातील बैठक सुमारे दोन तास चालली.दोन्ही देशांच्या सीमेवर भविष्यकाळात कोणतीही दुर्दैैवी घटना घडू नये, यासाठी दक्षता बाळगणे, तसेच जिथे संघर्ष सुरू आहे त्या भागातून सैन्याला माघारी जायला सांगणे या गोष्टी चीनने कराव्यात, असे या बैठकीत भारताने बजावले.
मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवा
परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले की, भारत व चीन ही दोन शेजारी राष्ट्रे असून, त्यांच्यात मतभेद असणे साहजिक आहे. मात्र, ते मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष नव्हे, तर परस्परांना सहकार्य करावे.