India China FaceOff: आमच्या काळात नव्हे, तर ६० वर्षांत देशाने ४३ हजार वर्ग किमी भूभाग गमावला, मोदी सरकारचा काँग्रेसवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:52 AM2020-06-21T02:52:31+5:302020-06-21T06:25:40+5:30
India China FaceOff: भारतीय सैन्य निर्णायक स्वरूपात एलएसीवर मुकाबला करीत आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनबाबत जे वक्तव्य केले त्यावरून विरोधकांनी केलेली टीका म्हणजे वाह्यात असल्याचे उत्तर शनिवारी पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, आमच्या हद्दीत चीनची घुसखोरी नाही, हे पंतप्रधानांचे वक्तव्य आमच्या सशस्त्र दलाच्या साहसानंतर उत्पन्न स्थितीशी संबंधित होते. भारतीय सैन्य निर्णायक स्वरूपात एलएसीवर मुकाबला करीत आहे.
मोदी सरकारने गत सहा वर्षांच्या काळात प्रथमच आपल्या टीकाकारांना याची आठवण दिली की, गत ६० वर्षांत ४३ हजार वर्ग किमी जागा आपण गमावली आहे. मोदी सरकारने हे स्पष्ट केले की, आमच्या कार्यकाळात असा अवैध ताबा मिळविण्यास परवानगी दिली नाही. मात्र, याचीही उत्सुकता आहे की, सरकारने ६० वर्षांचाच उल्लेख का केला? ६७ वर्षांचा का नाही? साहजिकच, त्यांनी मागील सरकारच्या कार्यकाळाचा उल्लेख केला.
सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नेहरू अथवा डॉ. मनमोहनसिंग यांनी हा भूभाग गमावला. २०१३ मध्ये चीनने भारताच्या क्षेत्रात १३ किमीपर्यंत आत डेपसांग भागापर्यंत घुसखोरी केली. तंबू ठोकले. डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यावेळी संसदेत सांगितले होते की, चीनची एलएसीबाबत वेगळी समज आहे.
>सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या नकाशात देशाचे चित्र स्पष्ट आहे. एलएसीवरील एकतर्फी परिवर्तनास सरकार परवानगी देणार नाही.काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य काही नेत्यांनी मोदींच्या विधानावर टीका केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने हे निवेदन केले आहे.