India China FaceOff: LACवरील कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास हवाई दल योग्य जागी तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:41 AM2020-06-21T02:41:11+5:302020-06-21T06:30:16+5:30
पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वूपर्ण समजले जात आहे.
हैदराबाद : भारत-चीन सीमेवरील वास्तविक रेषेवरील (एलएसी) कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास हवाई दल तयार आहे व योग्य जागी तैनात आहे, असे सूचक विधान हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी केले आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वूपर्ण समजले जात आहे.
दुंडीगलमध्ये हवाईदल अकादमीमध्ये कम्बाईन्ड ग्रॅज्युएशन परेडला (सीजीपी) संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, भारतीय हवाई दल चीनच्या हवाई दलाची क्षमता, त्यांची विमानतळे, संचलनात्मक तळ व भागातील त्यांची तैनाती याबाबत पूर्ण अवगत आहे. कोणत्याही आकस्मिक स्थितीशी निपटण्यासाठी आम्ही तयार आहोत. ते म्हणाले की, जगात शांतता नांदवी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. एलएसीवरील तणाव शांततेने निवळावा, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, त्याचवेळी कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास सक्षम आहोत.
आमच्या सुरक्षेसाठी आम्ही सशस्त्र दलांना हरघडी तयार राहण्यास सांगितले आहे. गलवान खोऱ्यातील स्थिती म्हणजे जगाला हा छोटासा नजारा दिसला आहे की अगदी कमी कालावधीत आम्ही काय करू शकतो, असेही ते म्हणाले.
>हवाई दल लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संकल्पित आहे व लडाखच्या गलवान खोºयातील आमच्या शूरवीरांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.