India China FaceOff: चीनला शिकवणार अद्दल; भारताचेही सीमेवर क्षेपणास्त्र,आव्हान देण्याची रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:29 AM2020-06-28T03:29:07+5:302020-06-28T08:13:14+5:30
चीनने नियंत्रण रेषेच्या परिसरात बांधकाम सुरू केल्याने भारतानेदेखील त्यास प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे . गलवान खोऱ्यावरचा चीनचा दावा खोडून काढल्यानंतर ड्रॅगनची युद्धाची खुमखुमी भारत जिरवेल.
नवी दिल्ली : चिनी सैनिकांना भारतीय हद्दीत घुसखोरी करणे महागात पडू शकेल, अशी तयारी भारताने सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केली आहे. चीनच्या दगाफटक्याचा अंदाज असल्याने हवाई हल्ला परतवणारे क्षेपणास्त्र ईशान्य लद्दाख सीमेवर सज्ज आह. लष्करी गुप्तहेर यंत्रणेनेही चिनी हेलिकॉप्टर घुसखोरी करण्याची शक्यता वर्तवली असून, त्यालाच कठोर संदेश देण्यासाठी भारताने क्षेपणास्त्र सज्ज ठेवले आहे.
लष्करी व राजनैतिक पातळीवरील चर्चेनंतर आता चीनशी संवाद साधण्यात काही अर्थ नाही, अशा विचारापर्यंत केंद्र सरकार व संरक्षण दले आली आहेत. चीनचा वन बेल्ट वन रोड, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि दक्षिण चीन समुद्रातील विस्ताराला भारताने तितक्याच ताकदीने आव्हान देण्याची रणनीती आखली आहे. आशिया खंडात अशांतता असल्यास (पान ६ वर) चीनचेच आर्थिक नुकसान होईल, हे उघडपणे जाणवत आहे. चीनच्या विस्तारवादी व आक्रमक धोरणांमुळे त्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणी मित्रच राहिलेला नाही.
चीनने नियंत्रण रेषेच्या परिसरात बांधकाम सुरू केल्याने भारतानेदेखील त्यास प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे . गलवान खोऱ्यावरचा चीनचा दावा खोडून काढल्यानंतर ड्रॅगनची युद्धाची खुमखुमी भारत जिरवेल. संरक्षणमंत्री व लष्कर तसेच हवाई दलप्रमुखांशी यांच्यात बैठका सुरू असून परिस्थिती चिघळल्यास प्रत्युत्तराची तयारी भारताने सुरू केली आहे. हवाई क्षेपणास्त्र स्वरक्षणासाठी सीमेवर हलवण्यात आले असले तरी प्रसंगी भारतीय जवानही आक्रमक पवित्रा घेतील. त्याला तिथे शस्त्रे वापरण्याची पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सैनिक १९९३ च्या करानान्वये अटीतटीच्या प्रसंगातही शस्त्राचा वापर करीत नाही. या करारात बदलाचे संकेत भारताने स्पष्टपणे दिले असून, त्यातून आम्ही युद्धास तयार आहोत, हाच संदेशच भारताने चीनला दिला आहे.
ड्रॅगनचा घुसखोरीचा पवित्रा उघड
पूर्व लडाख सीमेवरील पॅनगाँग त्सो सरोवर भागात चीनने नव्या हेलिपॅडचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे माघारीऐवजी चीनचा घुसखोरीचा पवित्रा उघड झाला आहे. सीमेवर ६ जूनपूर्वीची ‘जैसै थे’ स्थितीसाठी चीन तयार नसल्याचे दिसते. पॅनगाँग सरोवराच्या उत्तरेकडेत चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने तिथे निवाºयासाठी खोल्या, पिलबॉक्सेस व खंदक अशी बांधकामे केली होतीच. आता ‘फिंगर ४’ जवळ चीनचे सैन्य नवे हेलिपॅड उभारत आहे.
चीनचे नाटक : पॅनगाँग सरोवर तीन बाजूंनी पर्वतराजींनी वेढलेले आहे. त्यांच्या सुळक्यांना ‘फिंगर १,२,३...’ असे संबोधले जाते. चीनच्या सैन्याचा कायमस्वरूपी तळ ‘फिंगर ८’पाशी असून, आणखी आठ किमी पश्चिमेस ‘फिंगर ४’पर्यंत हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
दक्षिणेकडील काठावरही चिनी सैन्याची उपस्थिती वाढली आहे. यातून आपण आधीपासूनच तिथे आहोत, असे भासवण्याचे नाटक चीन करीत आहे.
दोन्ही सैन्ये आमने-सामने
त्या भागातील भारतीय सैन्याचा मुख्य तळ सध्या चीनचे सैन्य जेथे आहे तेथून दोन किमी पश्चिमेस ‘फिंगर ३’ पाशी आहे. त्याखेरीज ‘फिंगर ४’पाशी भारतीय सैन्याचा प्रशासकीय तळ आहे. चिनी सैन्याच्या ताज्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय सैन्यानेही ‘फिंगर ४’च्या आसपास अधिक तुकड्या तौनात केल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी दौन्ही सैन्ये अवघ्या ५०० मीटर अंतरावर आमने-सामने आहेत.