Ladakh Standoff: भारत-चीनमधील 'हा' वाद मिटणार का? आज लष्करी अधिकाऱ्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 07:38 AM2020-06-06T07:38:10+5:302020-06-06T07:54:13+5:30
या बैठकीकडे दोन्ही देशांव्यतिरिक्त जगातील शक्तिशाली देशांचे लक्ष आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, हा वाद मिटणार का?
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधीलभारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर शनिवारी दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठक होणार आहे.
या बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (Line of Actual Control - LAC) तणाव मिटविण्यासाठी भारताचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनीचे मेजर जनरल लियू लिन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारत-चीन सीमेजवळील चुशुल मोल्डो येथे ही बैठक ९ वाजता होणार आहे. दोन्ही देशांव्यतिरिक्त जगातील शक्तिशाली देशांचे लक्ष या बैठकीकडे आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, हा वाद मिटणार का?
भारत आणि चीन यांच्यातील हा वाद मिटविण्यासाठी स्थानिक कमांडर, प्रतिनिधीमंडळ आणि सर्वोच्च कमांडर स्तरावर जवळपास १२ वेळा चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. हा वाद संपण्याची आशा अजूनही कायम आहे, कारण शुक्रवारी पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये चर्चा झाली. संयुक्त सचिव स्तरावर झालेल्या या चर्चेत दोन्ही देशांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करून वाद मिटवण्यावर भर दिल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा बैठकीपूर्वी लेखी स्वरुपात अजेंडा शेअर केला जातो. या अजेंड्यावर बैठकीत चर्चा केली जाते आणि त्याखेरीज कोणत्याही पक्षाला अन्य कोणताही मुद्दा उपस्थित करायचा असेल तर ते बोलू शकतात. आज होणाऱ्या या बैठकीत गलवान परिसर, पँगोग त्सो आणि गोगरा परिसर यावर चर्चा होणार आहे. तसेच, या बैठकीतील सर्वात महत्वाचा मुद्दा पांगोग त्सो भागाचा असणार आहे. याठिकाणी चीनचे सैनिक फिंगर-4 वर आले आहेत, तर दोन्ही देशांमधील करारानुसार सैनिक ग्रे झोनमध्ये (जिथे भारत आणि चीन दोघेही दावा करतात) गस्त घालू शकतात, परंतु तेथे काहीही नाही तेथे सैनिक तैनात शकत नाही किंवा तेथे तंबूही बांधू शकत नाहीत.
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच हा वाद सुरू आहे. लडाखने एलएसीवर रस्ता बांधकाम करण्याचे काम सुरु केले होते. त्याला चीनने विरोध केला. यानंतर 5 मे रोजी पँगोंग तलावावर दोन्ही देशांचे सैनिक आपापसात भिडले. या चकमकीत काही सैनिकही जखमी झाले. यानंतर चीनने या भागात आपल्या सैनिकांची तुकडी वाढविली. तसेच, चीनने सैन्य तैनात करण्याबरोबरच त्यांनी तंबूही बांधले. भारतीय लष्कराच्या जवानांनी एलएसीवरील चीनच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानही एलएसी सीमेवर तैनात राहिले. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर मागे हटले आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान आपल्या जागेपासून एक किलोमीटर मागे हटले आहेत, असे सांगण्यात येते.