नवी दिल्ली- भारताने हिंदी महासागरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या जागी असणाऱ्या सेशेल्सला दुसरे डॉर्नियर विमान भेट म्हणून दिले आहे. सागरी संकटांपासून वाचण्यासाठी या विमानाचा आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी सेशेल्सला या विमानाची मदत होणार आहे. कालच भारताचा सेशेल्समध्ये नौदल तळ उभारण्यासाठी सकारात्मक बोलणी होऊन हा प्रलंबित मुद्दा मार्गी लागला आहे. भारताचे पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये काल विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे विमान सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फॉरे यांच्याकडे आज सुपूर्द केले. फॉरे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. हे विमान सेशेल्सला सागरी संकटांचा सामना करण्यासाठी वापरता येईल, आमच्या पंतप्रधानांनी सेशेल्सला मार्च 2015मध्ये भेट दिली होती त्यावेळेस या भेट म्हणून आणखी एक डॉर्नियर विमान देण्याची घोषणा केली होती. असे सुषमा स्वराज यांनी यावेळेस सांगितले.