नवी दिल्ली: ओमायक्रॉनचा धोका दिवसागणिक वाढत आहे. आफ्रिकेत सर्वप्रथम आढळून आलेल्या ओमायक्रॉननं आतापर्यंत तीन डझनहून अधिक देशांमध्ये शिरकाव केला आहे. गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. आजपर्यंत हा आकडा पाचवर पोहोचला आहे. कर्नाटकात २, तर महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत प्रत्येकी एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.
भारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती मंडाविया यांनी दिली. हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. 'लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. हा अभिमानाचा क्षण आहे,' असं मंडाविया म्हणाले. गेल्या २४ तासांत १ कोटी ४ लाख १८ हजार ७०७ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत १२७.६१ कोटी डोस दिले गेले आहेत.
शनिवारी देशात १ कोटीहून अधिक डोस देण्यात आले. 'हर घर दस्तक अभियान संपूर्ण वेगात सुरू आहे. जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली नवी उंची गाठत आहे,' असं केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण अभियान सुरू झालं. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर साठी ओलांडलेल्यांच्या लसीकरणास सुरवात झाली. यानंतर ४५ वर्षे पूर्ण केलेल्या लोकांचं लसीकरण सुरू झालं.
देशात ओमायक्रॉनचे पाच रुग्णगुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन दोन रुग्ण आढळून आले. त्यानंतर शनिवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. तर आज सकाळी दिल्लीत एका रुग्णाची नोंद झाली. हा व्यक्ती टांझानियाहून आला आहे.