Corona Virus: भारतात दाट लोकसंख्येमुळे कोरोनाचा धोका अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 04:14 AM2020-02-29T04:14:38+5:302020-02-29T04:17:47+5:30
भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. पण तेही बरे झाल्याने त्यांच्यापासून कोणाला धोका नाही आणि नंतर एकालाही लागण झालेली नाही.
नवी दिल्ली : कोरोना विषाणू चीनच्या बाहेर जगात पसरत असून भारतातील दाट लोकसंख्या, अपुरी आरोग्य व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात येथे होणारे स्थलांतर यामुळे कोरोनाचा धोका अधिक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. पण तेही बरे झाल्याने त्यांच्यापासून कोणाला धोका नाही आणि नंतर एकालाही लागण झालेली नाही. तसेच परदेशांतून येणाऱ्या प्रत्येकावर देखरेख ठेवण्यात येत असून, कोणीही घाबरू नये, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. आतापर्यंत २३,५३१ लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचे रुग्ण चीनबाहेर वेगाने वाढत आहेत. भारतातही आढळले आहेत. ते रुग्ण पसरत गेल्यास धोका वाढेल, अशी भीती हार्वर्डमधील प्रोफेसर के. विश्वनाथ यांनी व्यक्त केली आहे. भारतात एका वर्ग कि.मी.मध्ये ४२० लोक राहतात. चीनमध्ये हेच प्रमाण १४८ वर्ग कि.मी. आहे. मुंबई, धारावी आणि यासारख्या अन्य भागांत दाट लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे.
कोरोना पसरत असल्याने अमेरिकेतील गुप्तचर संस्था सावध आहेत. कोरोनाच्या धोक्याचा भारत कसा सामना करेल, याची या गुप्तचर संस्थांना काळजी वाटत आहे.