चीनच्या कपटनीतीमुळे भारत सतर्क, लडाखपासून अरुणाचलपर्यंत सीमेवर वाढवले लष्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 07:04 PM2020-06-11T19:04:12+5:302020-06-11T19:05:33+5:30
एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे.
नवी दिल्ली - एकीकडे कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले असताना दुसरीकडे भारत आणि चीनच्या सीमेवर सध्या प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही देशांमध्ये सैनिकी पातळीवर चर्चा झाली असली तरी तणावाचे वातावरण कायम आहे. एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे.
सद्यस्थित चीनच्या फौजा लडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ उभ्या आहेत. त्यामुळे चीनच्या रणनीतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील आपले लष्कर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर वाढवले आहे. तसेच दोन्ही देशांमधील सीमाप्रश्न चिघळत असल्याने भारताने या भागात रिझर्व्ह फौजा पाठवल्या आहेत.
दरम्यान, चीनने लडाखमध्ये ज्या प्रकारच्या चाली खेळल्या आहेत ते पाहता त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे सरकारमधील अतिविश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. चीनच्या मनात नेमकं काय चाललं आहे हेही संगता येणार नाही. त्यामुळे सद्यस्थिती पाहून लडाखमध्ये अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आले आहे. तसेच केवळ लडाखच नाही तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येसुद्धा फौजेची तयारी पूर्ण झाली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशमध्ये इंफंट्रीच्यी तीन डिव्हिजन आणि दोन अतिरिक्त ब्रिगेड तैनात करण्यात आल्या आहेत. तर उत्तराखंडमधील सीमावर्ती भागांमध्ये लष्कराच्या मदतीसाठी चिन्यालिसोर येथे हवाई दलालासुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे. सिक्कीममध्येसुद्धा चीनला लागून असलेल्या सीमेवर भारताकडून लष्कराची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे.
दरम्यान, चीनशी सीमेवरून मोठ्या प्रमाणात वाद असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्येसुद्धा भारताने लष्कर तैनात केले आहे. इथे ईस्टर्न सेक्टरमध्ये माऊंटेंन स्ट्राइक कोअरला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थिती अधिकच बिघडली तर त्याचा सामना करण्यासाठी लष्कराने सुकना येथील ३३ कोअर, तेजपूरचे ४ कोअर आणि रांची येथील १७ माऊंटेन स्ट्राइक कोअरला तैनात करण्यात आले आहे.