भारत पुढच्याच वर्षी बनणार सर्वाधिक लोकसंख्येचा देश, चीनला टाकणार मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:09 PM2022-07-12T12:09:08+5:302022-07-12T12:09:40+5:30
जागतिक जनसंख्या होणार आठ अब्ज, संयुक्त राष्ट्राच्या अहवालामुळे चिंता वाढली
भारतचीनला मागे टाकून पुढच्या वर्षी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्याची तसेच येत्या नोव्हेंबरच्या मध्याला जगाची लोकसंख्या आठ अब्ज होण्याची शक्यता आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक घडामोडी विभागाच्या लोकसंख्या कक्षाने ‘जागतिक लोकसंख्येचे भविष्य’ या विषयावरील अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, १९५० सालापासून लोकसंख्या सर्वात कमी वेगाने वाढत आहे. जगाची लोकसंख्या येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ८ अब्ज व २०३० सालापर्यंत ८.५ अब्ज व २०५०पर्यंत ९.७ अब्ज होण्याची शक्यता आहे. २०८०पर्यंत जागतिक लोकसंख्या १०.४ अब्जापर्यंत पोहोचेल व ती त्याच पातळीवर २१०० सालापर्यंत राहील. चीन हा सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्याला भारत लोकसंख्येबाबत काही महिन्यांनी मागे टाकण्याची शक्यता आहे.
आशियामध्ये सर्वाधिक लोकसंख्या
२०२२मध्ये जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले विभाग म्हणजे पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशिया हे आहेत. तिथे जगातील २९ टक्के म्हणजे २.३ अब्ज लोक राहतात. मध्य आणि दक्षिण आशियामध्ये २.१ अब्ज लोक असून जागतिक लोकसंख्येत त्यांचा वाटा २६ टक्के आहे. यंदाच्या वर्षी १.४ अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये चीन व भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे भारतीय संसाधने, सामाजिक समरसता आणि विकासाला वाळवी लागली आहे. सर्व धर्मांसाठी समानतेने लागू होईल, असा कायदा लागू व्हावा. लोकसंख्येची वाढती गती कठोर कायद्यानेच थांबेल. अन्यथा भारत जगाच्या तुलनेत विकासाच्या गतीत मागे पडेल, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले.
चीन, भारताची ११ जुलै २०२२ची लोकसंख्या
चीन - १ अब्ज ४५ कोटी ६ लाख ३२ हजार
भारत - १ अब्ज ४० कोटी ७९ लाख ९२ हजार