नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. भारतात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही पुन्हा अनेक जिल्ह्यांत, महानगरांत लॉकडाऊन करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागालाही यंत्रणा राबवताना नाकी नऊ येत आहे. त्यातच, कोरोना टेस्टींग अहवालसाठी लागणार विलंब आणि येणारा खर्च हा डोकेदुखी ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने आता जगातील सर्वात स्वस्त कोरोना टेस्टींग किट उपलब्ध करुन दिलं आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जगातील सर्वात स्वस्त किंमतीच्या कोरोना टेस्टींग किटचे ई-लाँचिंग केले. त्यावेळी, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हेही उपस्थित होते. यावेळ बोलताना रमेश पोखरियाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशातील तरुणाईला नेहमीच प्रोत्साहन देण्यात येते, वैद्यकीय क्षेत्रातील युवकांनाही कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मोदींनी मोटीव्हेट केलं आहे. कोरोना महामारीत नागरिकांना स्वस्त दराने कोरोना टेस्टींग उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. दिल्ली आयआयटीने हे आव्हान पूर्णत्वास नेले आहे. मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचं हे पहिलं पाऊल आहे. आयआयटीने बनविलेल्या कोविड 19 टेस्टींग किटला आयसीएमआर म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन केंद्रानेही मंजुरी दिली आहे. तसेच DCGI नेही गुणवत्तापूर्वक असल्याचं सांगत या किटला परवानगी दिली आहे.
केंद्रीयमंत्री पोखरियाल यांनी दिल्ली आयआयटीचेही अभिनंदन करताना, या मिशनमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या कार्याचं कौतुक केलं. तसेच, केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर आता हे किट अधिकृत टेस्टींग लॅबमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. या टेस्टींग किटची किंमत 399 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. दिल्ली आयआयटीकडून 10 कंपन्यांना या टेस्टींग किटच्या उत्पादनाची मान्यता देण्यात आली आहे.